प्रतिक्षा तावडे यांना राज्यस्तरीय नवदुर्गा पुरस्कार प्रदान !

कोल्हापूर येथे शानदार आयोजन
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: March 13, 2023 16:30 PM
views 205  views

सावंतवाडी : जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला  महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊंडेशनच्या वतीने राज्यभरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुणवंत महिलांच्या  अलौकिक कार्याप्रती दरवर्षी देण्यात  येत असलेले राज्यस्तरीय नवदुर्गा सन्मान पुरस्कार राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे नुकतेच प्रदान करण्यात आले.

 'शिक्षण क्षेत्रातील यशस्वी आदर्श नवदुर्गा' हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार यावेळी कणकवली तालुक्यातील माईण नंबर १ या शाळेतील उपक्रमशील पदवीधर शिक्षिका प्रतिक्षा प्रसाद तावडे यांना अप्पर पोलीस अधीक्षक कोल्हापूर जयश्री देसाई व पुढारीच्या उपसंपादक सुजाता पेंडसे यांच्याहस्ते  दुपट्टा, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

 शैक्षणिक ज्ञानाबरोबरच अनेक मुलींचे पालकत्व  स्वीकारून त्यांना शैक्षणिक  सुविधा  पुरवण्यात  महत्त्वाचे   कार्य सौ. तावडे यांनी केले आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे, असे महिला विभाग अध्यक्षा मनीषाताई लोहार यांनी सांगितले. प्रतिक्षा तावडे यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.