प्रणय शिवगण यांची साहस क्षेत्रात उत्तुंग झेप

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 03, 2025 18:46 PM
views 190  views

वैभववाडी : येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील प्रणय गुरुनाथ शिवगण यांने साहस क्षेत्रात उत्तुंग झेप घेतली आहे. त्याची मूलभूत पर्वतारोहण अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.

पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथील जवाहर इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग अँड विंटर स्पोर्ट्स या प्रतिष्ठित संस्थेतर्फे १८ एप्रिल ते २ मे २०२५ या कालावधीत झालेल्या  साहस अभ्यासक्रमात प्रणय याने उत्कृष्ट कामगिरी केली होती.हा अभ्यासक्रम त्याने यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.

प्रणय हा वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी असून ५८ महाराष्ट्रीय एनसीसी युनिट, सिंधुदुर्ग या युनिटचे प्रतिनिधित्व केले. एनसीसी दिल्ली मुख्यालयामार्फत त्यांच्या या विशेष प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती.

या अभ्यासक्रमात त्यांनी दोरीच्या गाठी बांधणे, आधार तयार करणे, रॅपलिंग, झिप लाईन, प्रवाह ओलांडणे, जुमरिंग, बौल्डरिंग, तंबू उभारणी, ट्रेकिंग अशा विविध साहसी व तांत्रिक क्रियांमध्ये उल्लेखनीय कौशल्य दाखवले. त्यांच्या प्रशंसनीय कामगिरीबद्दल कर्नल हेम चंद्र सिंग यांनी त्यांचे विशेष कौतुक केले असून "मूलभूत पर्वतारोहण अभ्यासक्रमासाठी शिफारस" केली आहे.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी, संस्थेचे पदाधिकारी आणि एनसीसी युनिटचे लेफ्टनंट रमेश काशेट्टी यांनी प्रणयचे हार्दिक अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.