
कुडाळ : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम तरतुदीनुसार प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत कुडाळ तालुक्यातील शिधापत्रकधारकांना अन्नधान्याचा लाभ देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील ४४ हजार व शहरी भागातील ५९ हजार वार्षिक उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना दरमहा तीन किलो तांदूळ, दोन किलो गहू शासनातर्फे मिळू शकतो व या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे गरजेचे आहे. तालुक्यातील काही शिधापत्रिकाधारकांनी अद्याप या योजनेसाठी अर्ज सादर केले नसल्याने तहसीलदार सचिन पाटील यांनी या योजनेसाठी लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत शिधापत्रिकेची छायांकित प्रत, कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड व आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ पात्र लाभार्थीने घ्यावा असे आवाहन कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.










