ग्राहक पंचायत कुडाळच्या अध्यक्षपदी प्रदीप शिंदे

Edited by:
Published on: June 22, 2025 16:48 PM
views 53  views

कुडाळ : ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या कुडाळ तालुका शाखा अध्यक्षपदी प्रदीप दत्तात्रय शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या कुडाळ शाखेची बैठक आज येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात झाली त्यावेळी कुडाळ तालुक्याची कार्यकारिणी निवडण्यात आली. 

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या राज्य कार्यकारिणीच्या सूचनेनुसार कुडाळ तालुक्याची पुनर्बांधणी करण्यासाठीची बैठक आज सकाळी संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे जिल्हाध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हा सचिव संजय तुळसणकर, उपाध्यक्ष सीताराम उर्फ दादा कुडतरकर, संघटक विश्वप्रसाद दळवी, सहसंघटक रिमा भोसले, सहसचिव सुगंधा देवरुखकर, नंदकिशोर साळसकर, कुडाळचे माजी अध्यक्ष आनंद मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते. 

 सुरुवातीला संजय तुळसणकर, सीताराम उर्फ दादा कुडतरकर, रिमा भोसले, विश्वप्रसाद दळवी यांच्यासह जिल्हाध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील यांनी ग्राहक चळवळीची आवश्यकता आणि त्या अनुषंगाने ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संघटनेचे कार्य याविषयी माहिती दिली. ग्राहकांना आपले अधिकारी माहीत असणे खूप गरजेचे आहेत. त्यासाठी ग्राहक पंचायतने सिंधुदुर्ग जिल्ह्यात संघटन वाढविण्यासाठी तालुकावार शाखा पुनर्बांधणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे, असे जिल्हाध्यक्ष प्रा. एस. एन पाटील यांनी सांगितले. संवाद आणि समन्वयातून ग्राहक कल्याण साधण्याचे काम ग्राहक पंचायत करीत आहे. ग्राहकांचे स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी स्थानिक शाखानी काम केले पाहिजे. तालुका शाखा सक्षम झाली तर जिल्हा सक्षम होईल, जिल्हा सक्षम झाला तर विभाग आणि राज्य संघटना सक्षम होईल. त्यामुळे आपली तालुका शाखा सक्षम करा. स्थानिक ग्राहकांना न्याय द्या, त्यांचे प्रश्न सोडवा, असे आवाहन प्रा. एस. एन. पाटील यांनी यावेळी केले. 

त्यानंतर सर्वसंमतीने कुडाळ तालुक्याची कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्ष - प्रदीप दत्तात्रय शिंदे, उपाध्यक्ष - सुदाम दत्ताराम राणे, सचिव - प्रा. अजित महादेव कानशीडे, सहसचिव - वसंत महादेव कदम, संघटक - प्रा. नितीन साबाजी बांबर्डेकर, सहसंघटक - नरेंद्र भालचंद्र गवंडे, प्रसिद्धी प्रमुख - निलेश अशोक जोशी, कोषाध्यक्ष - प्रा. अरुण आत्माराम मर्गज, सदस्य - पांडुरंग जयराम तोरसकर, सल्लागार - आनंद नारायण मेस्त्री यांची एकमताने निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष प्रा. एस. एन पाटील यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष प्रदीप शिंदे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. 

नूतन अध्यक्ष प्रदीप शिंदे यांनी ग्राहक जनजागृतीचे काम प्राधान्याने हाती घेणार असल्याचे सांगितले. सभेचे प्रास्ताविक आनंद मेस्त्री यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा सचिव प्रा. संजय तुळसणकर यांनी केले.