प्रभा प्रेरणा काव्य पुरस्कार 'अल्लाह ईश्वर ' काव्यसंग्रहाला जाहीर

Edited by:
Published on: July 25, 2024 05:52 AM
views 142  views

कणकवली : प्रभा प्रकाशन कणकवलीतर्फे केली चार वर्ष मराठीतील उत्तम साहित्य लेखन पुस्तकांची निर्मिती केली जात आहे. आता या पार्श्वभूमीवर नव्या लेखक कवींना प्रेरणा देण्यासाठी प्रभा प्रकाशनातर्फे प्रभावती बाळकृष्ण कांडर यांच्या स्मरणार्थ प्रभा प्रेरणा साहित्य पुरस्कार ही योजना सुरू करण्यात आली असून यावर्षीचा पहिला प्रभा काव्य पुरस्कार वैभववाडी तिथवली येथील सुप्रसिद्ध दिव्यांग कवी सफरअली इसफ यांच्या दर्या प्रकाशन पुणेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या 'अल्लाह ईश्वर' या काव्यसंग्रहाला जाहीर करण्यात आला आहे.

अडीच हजार रुपये स्मृतीचिन्ह शाल आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रभा प्रकाशन गेली काही वर्ष महाराष्ट्र बरोबरच कोकणातील साहित्य लेखनाची गुणवंत्ता असूनही मागे राहिलेल्या लेखकांच लेखन  चांगल्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथ प्रकाशित करत आहे. आजवर सिंधुदुर्गसह कोकणातील नव्या लेखकांची पुस्तके प्रभा प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आली आहेत. आता महाराष्ट्राबरोबरच कोकणातील नव्या लेखकांना प्रेरणा देण्यासाठी प्रभा प्रकाशनातर्फे यावर्षीपासून प्रभावती बाळकृष्ण कांडर यांच्या स्मरणार्थ प्रभा प्रेरणा साहित्य पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. 2024 चा हा पहिला पुरस्कार दिव्यांग कवी सफरअली इसफ यांच्या सध्या मराठी साहित्यात बहुचर्चित ठरलेल्या अल्लाह ईश्वर काव्यसंग्रहाला जाहीर करण्यात आला आहे.

अल्लाह ईश्वर या संग्रहाला ज्येष्ठ विचारवंत चंद्रकांत वानखडे यांची दीर्घ प्रस्तावना लाभली असून त्यात ते म्हणतात,कवीने वेदना भोगली, अन्याय अत्याचाराला तो सामोरा गेला,दु:ख, दारिद्रयाचे त्याने चटके सोसले, पदोपदी देशभक्ती सिध्द करण्याच्या यातना सहन केल्या तरीही त्याचा चांगुलपणावरचा विश्वास अबाधित आहे. कधीतरी परिवर्तनासाठी एकत्र येवूच आम्ही कधी तरी धर्मांधतेच्या भिंती पाडूच आम्ही."हा दुर्दम्य आशावाद हे या कविता संग्रहाचे व खुद्द कवीचे बलस्थान आहे.तर या संग्रहा संदर्भात समीक्षक प्रा. संजीवनी पाटील यांनी दीर्घ लेखन केले असून त्यात त्या म्हणतात, जाती धर्माच्या दबावाला बळी पडून जगणाऱ्या दुःखितांबद्दलची असणारी एक कणवता म्हणजे अल्लाह ईश्वर मधील कविता आहेत. वर्तमानाशी समांतर असणाऱ्या या कविता निश्चितच एका  सामाजिक आगतिकतेच्या अंतरीचे सूचन करतातच शिवाय भविष्याविषयीचा आशावादही व्यक्त करतात. आजच्या धार्मिक कोलाहलाने भारलेल्या वर्तमानात हा काव्यसंग्रह म्हणजे एक प्रार्थना गीत आहे.