
कणकवली : मराठीतील प्रसिद्ध कवी अजय कांडर यानी नव्या आणि गुणवत्ता असणाऱ्या दुर्लक्षित लेखक कवींचे लेखन सर्वदूर चांगल्या वाचकांपर्यंत पोहोचावे म्हणून प्रभा प्रकाशनाच्या कामाला पाच वर्षांपूर्वी प्रारंभ केला. या अल्प कालावधी मध्ये प्रभा प्रकाशनाने कविता, ललित, वैचारिक, संगीतआणि सामाजिक विषयावरील विविध ग्रंथ प्रकाशित करून अनेक दुर्लक्षित लेखक, कवींना मंच उपलब्ध करून दिला. आता प्रभा प्रकाशनातर्फे एकाच वेळी सहा ग्रंथ प्रकाशित करण्यात येत असल्याची माहिती प्रभा प्रकाशानाचे संचालक अजय कांडर यांनी दिली.
या सहा नव्या ग्रंथांमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील संगीताचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा.डॉ. तुकाराम वांढरे यांच्या पंडित विष्णू नारायण भातखंडे संगीतिकार्य आणि कर्तुत्व, सेवानिवृत्त वृद्धांच्या समस्या, संभाजीनगर येथीलच दुसरे लेखक डॉ. आरगडे अंबादास यांच्या भारतीय संविधान आणि प्रशासन, मुंबई येथील प्रसिद्ध नाटककार,कवी उदय जाधव यांच्या पांढऱ्याशुभ्र स्क्रीनवर, सातारा येथील मनीषा शिरटावले यांच्या विसावादाशी संवाद आणि सातारा येथीलच अश्विनी कोठावळे यांच्या अनुभूती आदी ग्रंथांचा समावेश आहे.
आजच्या सोशल मीडियाच्या काळात साहित्य लेखन करणे सोपे पण ते लेखन प्रकाशित करणे कठीण असते. कारण ग्रंथ प्रकाशित केला तर त्याला वाचक उपलब्ध होईलच याची शाश्वती नाही. सोशल मीडियामुळे वाचनाची जिज्ञासा कमी होऊ लागली आणि त्याचा परिणाम ग्रंथ प्रकाशित होण्यावरही झाला. अशा परिस्थितीत अजय कांडर यांनी प्रभा प्रकाशनतर्फे आयएसबीएन नंबरसह वेगवेगळे ग्रंथ उत्तम निर्मितीने प्रकाशित करून ते महाराष्ट्रातल्या जाणकार वाचकांपर्यंत पोहोचविले. ग्रंथाची विक्री फार होत नसेल तर अशावेळी चांगल्या लेखक कवीचे प्रभा प्रकाशनातर्फे प्रकाशित केलेले ग्रंथ मराठीतल्या चांगल्या लेखक समीक्षकांपर्यंत स्वतःहून पाठविण्याची कल्पना प्रभा प्रकाशनातर्फे अमलात आणली गेली आणि प्रभा प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या लेखक कवीचं नाव सर्व दूर पोहोचलं. प्रभा प्रकाशनच्या प्रकाशित करण्यात आलेल्या बहुसंख्य ग्रंथांना महत्त्वाची पारितोषिकेही प्राप्त झालेली आहेत. ग्रंथ प्रकाशित करणे आणि ते ग्रंथ पुरस्कार योजनेसाठी पाठविण्याची कल्पना अमलात आणणे, विविध नियतकालिकांमध्ये किंवा पोर्टल मध्ये त्या ग्रंथांवर समीक्षा लेखन करून प्रसिद्ध करणे, प्रसंगी त्या समीक्षा लेखनाचा ग्रंथ प्रकाशित करणे आणि प्रकाशित ग्रंथाचा प्रकाशन समारंभ करण्यासाठी लेखक कवीला पाठबळ देणे असं नियोजन प्रभा प्रकाशनतर्फे केल जात. या पार्श्वभूमीवर कोकण बरोबर महाराष्ट्रातील अनेक लेखकांनी प्रभा प्रकाशनातर्फे आपले ग्रंथ प्रकाशित केले आहेत.
या लेखक कवींमध्ये प्रा. डॉ . जिजा शिंदे, डॉ योगिता राजकर, प्राचार्य राजेंद्र शेंडगे, सफरअली इसफ, शंकर जाधव, आनंद हरी, मनीषा शिरटावले, विजय सावंत, डॉ शिवप्रिया, प्रमिता तांबे, हरिचंद्र भिसे, संजय तांबे, डॉ प्रफुल आंबेरकर, डॉ अमुल पावसकर, कल्पना बांदेकर, किशोर कदम अशा अनेक लेखक कवींच्या ग्रंथांचा समावेश आहे. कवी लेखकांची गुणवत्ता विकसित करणे आणि त्यांचं चांगलं साहित्य चांगल्या वाचकांपर्यंत पोहोचविणे हीच प्रभा प्रकाशनाने बांधिलकी कायम जपली असल्याचीही माहिती अजय कांडर यांनी दिली.