झारापमध्ये सत्तेचा थरार ; सरपंचांवर अविश्वास

उद्या विशेष सभेत होणार ताकदीची परीक्षा
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: April 09, 2026 17:03 PM
views 21  views

कुडाळ : झाराप ग्रामपंचायतीत सत्तेचा खेळ रंगला असून लोकनियुक्त महिला सरपंच दक्षता मेस्त्री यांच्या विरोधात आठ सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर उद्या शुक्रवार, दिनांक 10 रोजी दुपारी साडेतीन वाजता तहसीलदार सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निर्णायक विशेष सभा होणार आहे. या सभेत सरपंचांची सत्ता टिकणार की जाणार, याचा फैसला होणार असल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष झारापकडे लागले आहे.

झाराप ग्रामपंचायतीत प्रथमच लोकनियुक्त महिला सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव दाखल झाल्यामुळे गावातील राजकारण चांगलेच तापले आहे. सत्तेच्या समीकरणात मोठे उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत असून, सदस्यांमधील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर आला आहे.

दरम्यान, उद्याच्या सभेसाठी प्रशासन सतर्क झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. झारापमध्ये उद्या राजकीय नाट्य रंगणार असून, या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.