
सावंतवाडी : गणेशोत्सवानंतर दीपावलीमध्येही वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्याने महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सातार्डा पंचक्रोशीसह सावंतवाडी तालुक्यातील काही भागांमध्ये होती. शहारत देखील ये-जा सुरू होती. वीज समस्या सोडविण्यासाठी सरकारकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने तीव्र नाराजी वीज ग्राहकांनी व्यक्त केली आहे.
दिव्यांचा सण म्हणून दीपावली साजरी होत असताना सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा गाव दोन दिवस अंधारात होता. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे ग्रामस्थांना अंधारातच दिवाळी साजरी करावी लागली. ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही वीज पुरवठा खंडित झाला. तो रात्री सुरळीत झाला. सावंतवाडी तालुक्यातील चौदा गाव वेंगुर्ला वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयाशी जोडण्यात आलेले आहेत. यामध्ये सातार्डा,आरोंदा,मळेवाड,आजगाव,कोंडूरे,तळवणे,कवठणी,किनळे आदी गावांचा यात समावेश आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर अधिकाऱ्यांना कॉल केल्यानंतर ते कॉल घेत नसल्याची तक्रार आहे. महावितरण कंपनीने दिलेले नंबर बंद येतात, याकडे लक्ष कोण देणार ? असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. सावंतवाडी तालुक्यातील १४ गावांना सावंतवाडी उप अभियंता कार्यालयाला जोडण्यात यावे, अशी मागणी पुन्हा केली आहे. यापूर्वी केलेल्या मागणीची दखल न घेतल्यान नाराजी आहे.
सातार्डा पंचक्रोशीमध्ये सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने संतप्त झालेल्या वीज ग्राहकांच्या वतीने आता महावितरण कंपनीच्या विरोधात 'मेणबत्ती मोर्चा' काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सातार्डा ग्रामपंचायत माजी सरपंच उदय पारिपत्ते यांनी हा इशारा दिला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ महिलांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे. वेंगुर्ला वीज महावितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रातील सावंतवाडी तालुक्यातील गावांमध्ये वीज समस्यांकडे अधिकारी पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप श्री. पारिपत्ते यांनी केला आहे. अनेक वर्षांपासून काही अधिकारी एकाच पदावर आणि एकाच खुर्चीवर बसून असल्याने त्यांची मुजोरी वाढली आहे. त्यामुळे हे अधिकारी वीज ग्राहकांचे कॉल घेत नाहीत आणि त्यांच्या तक्रारींकडेही लक्ष देत नाहीत. सणासुदीच्या काळातही वारंवार वीज खंडित होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. या अनागोंदी कारभाराच्या विरोधात आणि महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ महिलांच्या सहभागाने 'मेणबत्ती मोर्चा' काढण्याचा इशारा दिला आहे.