
कणकवली : समृद्धी महामार्गवर झालेल्या अपघातात २५ जण होरपळून ठार झालेत. सिंधुदुर्गात खड्डेमुक्त रस्त्यांची पोकळ घोषणा सत्ताधारी करतात. मात्र अवघ्या ८ दिवसांत नवीन बनवलेल्या रस्त्यांवर सुदधा खड्डे पडू लागलेत. आंगणेवाडी ला जाणाऱ्या रस्त्यावर १४ कोटींचा निधी खर्च झाला. मात्र, पहिल्याच पावसात या रस्त्यांवर खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. पालकमंत्र्यांचे जिल्ह्याकडे लक्ष नसून निधी आणल्याच्या केवळ घोषणाच करत आहेत. गोव्यातील रस्ते चकाचक असतात मग सिंधुदुर्गात दर्जेदार रस्ते का होत नाही ? पिडब्ल्यूडी अधिकारी आणि ठेकेदारानी पिडब्ल्यूडी मंत्री चव्हाण यांच्या घेतलेल्या भेटीतून जिल्ह्यात रस्ते कामांसाठी निधी आला नसल्याचे सिद्ध झाले आहे. हे अधिकारी आणि ठेकेदार मंत्र्यांचा कट ठरवण्यासाठी गेले होते काय ? असा सवाल मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला.
राज्याचे बांधकाममंत्री जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून मिळाले तरी जिल्ह्याच्या विकासात फरक पडला नाही. वर्ष झाले तरी पिडब्ल्यूडी च्या कार्यपद्धतीत कोणताच फरक पडला नाही. समृद्धी महामार्गाप्रमाणेच सिंधुदुर्गातही अपघात घडण्याची शक्यता आहे.रस्ता बनवल्यानंतर वॉरंटी पिरियड मध्ये किती ठेकेदार रस्ता दुरुस्ती करतात ? हा प्रश्न निरुत्तरीत आहे. त्यामुळे याचा जाब विचारणाऱ्यांना समाजकंटक म्हणून हिनवणे मनसे खपवून घेणार नाही. रस्त्यांच्या कामाच्या दर्जा बाबतच्या माहितीसाठी थेट जनतेचा सहभाग असावा यासाठी मनसे तांत्रिक सल्लागारांच्या कार्यशाळा घेणार असल्याचेही उपरकर म्हणाले.