
सिंधुदुर्गनगरी : ‘डाक सेवा जन सेवा’ अंतर्गत डाक विभागामध्ये उपलब्ध असलेल्या सर्व सेवा, सुविधा व बचत योजना यांची माहिती व त्यांचा लाभ ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना त्यांच्या गावातच घेता यावा याकरिता डाक विभागाच्या वतीने ‘डाक मेळाव्यांचे’ आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये डाक विभागाच्या अल्प बचत योजना, आधार सेवा, लहान मुलांची नवीन आधार नोंदणी, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, टपाल जीवन विमा अशा सर्व सेवांची माहिती व योजनेचा तत्काळ लाभ गावातील सर्व नागरिकांना घेता येणार आहे.
शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ गावांतील गरजू व इच्छुक लोकांना मिळावा यासाठी सिंधुदुर्ग डाक विभागाद्वारे जिल्ह्यात जुलै २०२४ पासून विविध ठिकाणी ‘डाक मेळावे’ आयोजीत करण्यात येत आहेत. या मेळाव्यांच्या ठिकाणी विशेषकरून सध्या महाराष्ट्र शासनाने घोषीत केलेल्या ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने’ चे पैसे जमा होण्यासाठी महिलांची ‘शून्य रकमेने’ पोस्टाची बचत खाती काढता येणार आहेत, ज्याचे पासबुक त्वरित खातेदारास देण्यात येईल. सिंधुदुर्ग विभागात पावशी (ता. कुडाळ) येथे १८.०७.२०२४, मालवण प्रधान डाकघर येथे २०.०७.२०२४, सावंतवाडी प्रधान डाकघर येथे २२.०७.२०२४, बोर्डवे येथे २३.०७.२०२४, अचिर्णे (ता. वैभववाडी) येथे २४.०७.२०२४, तळवडे (ता. सावंतवाडी) २५.०७.२०२४ व आंदुर्ले (ता. वेंगुर्ले) येथे २५.०७.२०२४ रोजी ‘डाक मेळावे’ आयोजीत करण्यात आलेले आहेत.
तरी डाक विभागाच्या या अभिनव उपक्रमाचा लाभ घेऊन गावागावांतील सर्व लोकांनी डाक विभागाच्या सेवा व योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन डाक अधीक्षक यांचेकडून करण्यात येत आहे. अधिक माहितीकरिता नजीकच्या डाकघराशी संपर्क साधावा.