
सिंधुदुर्ग : जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचा अलीकडील स्वीडन दौरा केवळ अभ्यासापुरता मर्यादित नव्हता, तर त्यामागे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मोठी गुंतवणूक आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती खेचून आणण्याचे महत्त्वपूर्ण धोरण होते.
स्वीडन हा देश जलवाहतुकीसाठी जगभर ओळखला जातो. याच पार्श्वभूमीवर, पालकमंत्री राणे यांनी तेथील प्रख्यात 'कॅन्डला (Candela)' कंपनीच्या कार्यप्रणालीचा आणि उत्पादन क्षमतेचा सखोल अभ्यास केला.
सिंधुदुर्गला मिळणार 'सी-शोर'चा फायदा?
कॅन्डला कंपनी जहाज बांधणीची कामे करते आणि यासाठी त्यांना समुद्रकिनाऱ्याची आवश्यकता असते. सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेल्या विस्तीर्ण आणि सुरक्षित समुद्रकिनाऱ्याचा फायदा या कंपनीला मिळू शकतो, हे राणे यांच्या दौऱ्याचे मुख्य केंद्र होते.
कॅन्डला कंपनी इलेक्ट्रिक बोटी बनवते, ज्यांची क्षमता एकावेळी 30 प्रवासी घेऊन जाण्याची आहे. या बोटी आधुनिक आणि सुरक्षित असून, त्या डिझेलची बचत करणाऱ्या आहेत. कॅन्डला कंपनीची एक बोट डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात दाखल होत असून, ती गेटवे ऑफ इंडिया येथे उतरवली जाणार आहे.
सिंधुदुर्गात कारखाना झाल्यास...
या इलेक्ट्रिक बोटींची निर्मिती करण्यासाठी जर कॅन्डला कंपनीचा कारखाना सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभा राहिला, तर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी गती मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यामुळे सिंधुदुर्गातील असंख्य तरुणांना मोठा रोजगार उपलब्ध होईल.
स्वीडन दौऱ्याच्या माध्यमातून नितेश राणे यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि स्थानिक नैसर्गिक संसाधनांचा मेळ घालून जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न सुरू केला आहे.










