
सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील जगप्रसिद्ध लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या चितारआळीतील गटारांच्या दुरवस्थेमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आज चितारआळीतील रहिवासी आणि महिलांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांची भेट घेतली. मंजूर झालेले गटाराचे बांधकाम तातडीने सुरू करण्याची मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली.
यावेळी उपस्थित नागरिकांनी चितारआळीतील घरे आणि दुकानांसमोरील गटारांची बिकट अवस्था निदर्शनास आणून दिली. गटारे अत्यंत खराब झाल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच गटाराच्या या दुरावस्थेमुळे चितारआळीला भेट देणाऱ्या पर्यटकांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे, असे नागरिकांनी सांगितले.
यापूर्वी नागरिकांनी याबाबत नगरपरिषदेकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाने नवीन गटार बांधकामाला मंजुरी दिली आहे. मात्र, ठेकेदाराने बांधकाम साहित्य आणून ठेवले असले तरी प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात केलेली नाही. त्यामुळे मंजूर असलेले हे काम ठेकेदाराकरवी त्वरित सुरू करून घ्यावे अशी आग्रही मागणी यावेळी मंदार नार्वेकर यांनी केली.
आता पर्यटनाचा हंगाम सुरू होत असल्याने लाकडी खेळण्यांसाठी जगभर ओळखली जाणारी चितारआळीची बाजारपेठ लवकरच पर्यटकांच्या गर्दीने फुलणार आहे. त्यामुळे पर्यटन हंगामापूर्वी गटाराचे बांधकाम पूर्ण करण्याची मागणी यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी यांनी केली.
चितारआळी केवळ खेळण्यांसाठीच नव्हे, तर येथील प्रसिद्ध चितारआळीच्या गणपतीमुळेही ओळखली जाते. त्यामुळे येथे देश-विदेशातील पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. अशा महत्त्वाच्या ठिकाणी गटारांची दुरावस्था होणे हे अत्यंत खेदजनक आहे, असे नागरिकांनी व उपस्थित महिलांनी नमूद केले. मंजूर झालेले काम ठेकेदारांकडून त्वरित सुरू करून घ्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
अखेर नागरिकांच्या मागणीची दखल घेत मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी करण्याचे आणि संबंधित ठेकेदाराला त्वरित काम सुरू करण्याचे निर्देश देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी, मंदार नार्वेकर, राघू चितारी, महेश चितारी, उदय चितारी, शिल्पा वेर्णेकर, अमित चितारी, चेतन चिंदरकर, प्रकाश चितारी, राधिका चितारी, गजानन चितारी, डॉ. प्रथा पै, भूपेंद्र सावंत, गुरुनाथ चितारी, प्रसाद वर्णे, जयवंत म्हापसेकर, मानवी गुडीगार, वैभव परब, मयुरेश सावंत, शिवाली काणेकर, शांती सावंत, गौरव दळवी, निलेश वेर्णेकर, वासुदेव हवालदार, राजेश काणेकर, अंकिता काणेकर, जासिम सारंग यांच्यासह चितारआळीतील अनेक नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.