
कुडाळ : कुडाळ शहरातील बाजारपेठेतून जाणाऱ्या रस्त्यांची सध्या अत्यंत दुरवस्था झाली असून, जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहनचालक कमालीचे त्रस्त झाले आहेत. रस्त्यांची चाळण झाल्याने अपघातांचा धोका वाढला असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून कुडाळ बाजारपेठेतील मुख्य रस्त्यांवर लहान-मोठे खड्डे पडण्यास सुरुवात झाली होती, मात्र आता त्यांची संख्या आणि आकार इतका वाढला आहे की, रस्ते कमी आणि खड्डेच जास्त अशी स्थिती निर्माण झाली आहे. दुचाकीस्वारांना तर खड्डे चुकवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती असते. खड्ड्यांमुळे धूळ उडते आणि पावसाळ्यात चिखल होतो, याचा व्यवसायावरही परिणाम होत आहे."
या रस्त्यांवरून पायी चालणाऱ्या नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अनेकदा पाणी साचते, त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्याच्या कडेला चिखलातून चालावे लागते. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी तर हे रस्ते धोकादायक बनले आहेत.
या गंभीर समस्येकडे स्थानिक प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांकडून जोर धरू लागली आहे. या रस्त्यांची डागडुजी न झाल्यास, परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.