पूनम चव्हाण यांच्या प्रचाराचा दणक्यात शुभारंभ

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 21, 2025 17:06 PM
views 308  views

मालवण : लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना सन्मान देण्याचे काम शासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. आतापर्यंत महिलांना वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले गेले. त्यांनी केवळ घर, संसार सांभाळायचा या पलीकडे महिलांचा कधी विचार केला गेला नाही. अशा परिस्थितीत सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. ही बाब कौतुकास्पद आहे. कारण स्त्री सक्षम असेल, शारीरिक दृष्टया सबल असेल, आरोग्य चांगले असेल तर समाज सक्षम बनू शकतो. त्यामुळे समाजातील प्रत्येक महिलेने धनुष्यबाण या चिन्हाला साथ द्यायला हवी. पक्षाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. शहराच्या विकासासाठी आमदार निलेश राणे यांच्या पाठीशी या लाडक्या बहिणी खंबीरपणे उभ्या राहतील असा विश्वास पूनम चव्हाण यांनी व्यक्त केला. 

मालवण पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ४ ब च्या उमेदवार पूनम चव्हाण यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज शहरातील बसस्थानक नजीकच्या राममंदिर येथे करण्यात आला. यावेळी विधानसभा प्रमुख बबन शिंदे, शिवाजी परब, नागेश चव्हाण, रवी मालवणकर, महेश कोळंबकर, भरत मालवणकर, महेंद्र मालवणकर, अरविंद मालवणकर, साहिल जाधव, महेश मालवणकर, श्रीकांत मालवणकर, अमित सावंत, माधुरी जाधव, वैष्णवी कोळंबकर, सीमा कोळंबकर, नूतन मालवणकर, नयना मालवणकर, निशा मालवणकर, महेंद्र मालवणकर, अविनाश मालवणकर, देवीदास गावकर, स्मिता प्रभाळे, अपर्णा सावंत, शिवानी सावंत आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सौ. चव्हाण म्हणाल्या, मालवण शहराच्या सर्वागीण विकासासाठी आमदार निलेश राणे हे प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना मालवणवासीयांची साथ तर लाभणारच आहे. हा विकास साधायचा असेल तर मालवण पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकविला पाहिजे. माझ्या प्रभागातील विविध समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. स्थानिक जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिले. त्यामुळे जनतेने आतापर्यंत दाखविलेला विश्वास आणि प्रेम कायम सदोदित असेच ठेवेन. त्यामुळे येत्या २ तारखेला पक्षाच्या तिन्ही उमेदवारांना प्रभागातून भरघोस असे यश मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.