
वेंगुर्ले : निवती- श्रीरामवाडी खाडीवर ज्या ठिकाणी समुद्र व नदीचा संगम होतो त्या ठिकाणी वेंगुर्ले नवाबाग येथील झुलत्या पुलाच्या धर्तीवर पर्यटन दृष्ट्या महत्त्वाचे असणारे पूल होण्यासाठी सुमारे ३ कोटींचा निधी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आला होता. मात्र या पुलासाठी झालेल्या अंदाजपत्रकाचा विचार करता व येथील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता अजूनही २ कोटींच्या निधीची आवश्यकता असल्याने हे पुल रखडले असल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली असून वाढीव निधीची मागणी ग्रामस्थांतून होतेय.
निवती हे वेंगुर्ले तालुक्यातील प्रसिद्ध असे पर्यटन स्थळ आहे. भविष्यात या ठिकाणी पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. या गावातून जाणाऱ्या खाडीमुळे मेढा निवती व श्रीरामवाडी असे दोन भाग झालेले आहे. मात्र येथील ग्रामपंचायत ही एकच आहे. या भागातील एकनाथ षष्ठी हा एक धार्मिक कार्यक्रम श्रीरामवाडी येथे होतो आणि या कार्यक्रमासाठी येथील स्थानिक ग्रामस्थ आपल्या मच्छीमारी होड्यांचा पूल तयार करून लोकांना जाण्या येण्याची व्यवस्था करतात सुमारे ५ ते ६ दिवस हा पूल त्या ठिकाणी असतो. तसेच ग्रामपंचायत संदर्भात काही कामकाज असल्यास श्रीरामवाडीतील ग्रामस्थांना निवती येथे १५ किलोमीटरचा म्हापण मार्गे फेरा मारून जावे लागते. तसेच श्रीरामवाडी व शेळपी येथील लोकांना जीव धोक्यात घालून निवती येथे जावे लागते.
या खाडीवर ज्या ठिकाणी समुद्र व नदीचा संगम होतो त्या ठिकाणी वेंगुर्ले नवाबाग झुलत्या पुलाच्या धर्तीवर पूल होण्यासाठी गेले कित्येक वर्षे ग्रामस्थांची मागणी होती. यावेळी वेळोवेळी याबाबत बऱ्याच जणांनी आश्वासनेही दिली होती. याची दखल घेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विशेष प्रयत्नातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व पर्यटनमंत्री गिरीष महाजन यांच्या माध्यमातून २०२२-२३ राज्य शासनाच्या प्रादेशिक पर्यटन अंतर्गत तीन कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र त्यावेळी केलेल्या जुन्या अंदाजपत्रकात बदल झाल्याने व येथील भौगोलिक स्थितीचा विचार करता या पुलाला अधिकच्या २ कोटींची म्हणजे एकूण ५ कोटींच्या निधीची आवश्यकता लागणार आहे. २ कोटी रुपये जादा निधी अभावी सदरचे काम रखडून राहिले आहे.
त्यामुळे सदरचा निधी हा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सिंधू रत्न योजनेअंतर्गत किंवा प्रादेशिक पर्यटन योजनेतून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण झाल्यास हे पूल पर्यटनातील मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही. दरम्यान याबाबतची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेतली असता अपुऱ्या निधी अभावी हे काम सुरू होऊ शकले नसल्याचे त्यांनी सांगीतले आहे.










