'पुस्तकाचे गाव’ योजनेत सिंधुदुर्ग मधील पोंभुर्ले गाव

दीपक केसरकर यांची घोषणा...!
Edited by: देवयानी वरसकर
Published on: November 03, 2023 10:34 AM
views 912  views

मुंबई : राज्यात वाचन संस्कृती वाढावी,मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा यादृष्टीने पुस्तकाचे गाव योजना राबविण्यात येत आहे.या योजनेचा टप्प्या-टप्प्याने विस्तार करण्यात येत असून नव्याने विकसित करण्यात येणाऱ्या चार गावांमध्ये वाचकांना दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून द्यावीत, असे निर्देश मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी येथे एका बैठकीत दिले.

यावेळी मराठी भाषा विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, उपसचिव हर्षवर्धन जाधव,अवर सचिव अजय भोसले, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ.श्यामकांत देवरे आदी उपस्थित होते.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ, गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभूर्ले आणि सांगली जिल्ह्यातील अंकलखोप (औदुंबर) येथे पुस्तकांचे गाव योजनेचा विस्तार करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली. या गावांमध्ये विविध साहित्य प्रकारांची विभागणी करून १० दालने तयार करण्यात यावीत. या दालनांमध्ये वाचकांना सर्व प्रकारची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून द्यावीत. तसेच त्यातील एका दालनात मराठी भाषा विभागाची विविध प्रकाशनेही उपलब्ध असावीत,असेही निर्देश मंत्री केसरकर यांनी दिले. तसेच येथे पर्यटक सुद्धा आकर्षित व्हावेत यासाठी गावामध्ये भिंती रंगवून वातावरण निर्मितीही करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.या दालनांसाठी प्रत्येकी एक हजार दर्जेदार पुस्तकांची यादी तयार करण्याचेही निर्देश त्यांनी राज्य मराठी विकास संस्थेस दिले.