
सावंतवाडी : शाळा आणि जनतेत जाऊन पोलीस जनजागृती करत आहेत. पोलीस हे जनतेचे सेवक आहेत ही संकल्पना सिंधुदुर्ग पोलिसांनी हाती घेऊन तळागाळातील लोकांपर्यंत ते पोहोचवण्यासाठी उपक्रम सुरू केले आहे.प्रत्यक्षात विद्यार्थी व नागरिकात जाऊन पोलीस संवाद साधत आहेत हे कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्यावतीने " रेझिंग डे " सप्ताहाच्या अनुषंगाने पोलीस दलाची व पोलिसांच्या कामकाजाची नागरिकांना माहिती होण्याकरिता " जगन्नाथराव भोसले उद्यान, सावंतवाडी " येथे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. यावेळी युवराज लखमराजे भोसले बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, सावंतवाडी नगरपरिषद मुख्याधिकारी सागर साळुंखे, भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले म्हणाले, पोलीस रेझिंग डे हा दरवर्षी साजरा केला जातो. पण यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस रेझिंग वीक साजरा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शहरांमध्ये किंवा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस माहितीचे स्टॉल उभारून जनता व विद्यार्थ्यांना माहिती देत आहेत. पोलिस सेवेची जनजागृती करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे. शासन आपल्या दारी जसे येतं तसं पोलीस आपल्या दारी आलेले आहेत. विदेशामध्ये काही घटना घडली तर फोन नंबर डायल करून पोलिसांना माहिती दिली जाते तशी पद्धत आपल्याकडे देखील लोकांनी स्वीकारली पाहिजे. पोलीस आणि कोर्टाची पायरी चढू नये असे अशी भीती आजही नागरिकात दिसून येते. पण पोलीस हे जनतेचे सेवक आहेत. तुमच्या आमच्यातलेच वर्दी परिधान केलेले पोलीस आहेत त्यामुळे कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही. कोरोना काळात जसे नागरिक दूर राहत होते तसे अंतर जनता व पोलिसांत राहू नये ते अंतर पोलीस आणि जनतेतील दूर होऊन जनता आणि पोलिसांनी एकमेकांना सहकार्य करून हातात हात घालून काम करावे. एखादा अपघात झाल्यास त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले पाहिजे, त्याचा जीव वाचला पाहिजे. हाॅस्पीटल मध्ये घेऊन जाणाऱ्या सर्व संबंधितांचा सन्मान पोलिस करत आलेले आहे. पोलीस त्रास देणारे नसतात ते जनतेचे सेवक आहेत हे समजण्यासाठी आम्ही लहान मुले, विद्यार्थी पासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येक नागरिकाला सजग करत आहोत, असे त्यांनी सांगितले
पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण म्हणाले, पोलिस सेवेची माहिती सर्वांना व्हावी म्हणून पोलिस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांनी प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनामध्ये श्वानपथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक, सायबर गुन्हे सुरक्षा, अग्निशस्त्रे, फॉरेन्सिक युनिट, महिला सहाय्य, वाहतूक नियमन व नियंत्रण, पोलीस दलाची रचना व कार्यपद्धती याबाबत माहिती देण्यात येत आहे. सर्वांनी भेट देऊन पाहणी करावी.
यावेळी श्वानपथक , बॅंण्ड पथक यांनी शानदार मांडणी केली. विद्यार्थ्यांना खिळवून ठेवले. अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले यांनी यावेळी उपस्थितांना दिलासा दिला. यावेळी प्रास्ताविक पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण तर स्वागत पोलिस उपनिरीक्षक सौ. माधुरी मुळीक यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शहर व परिसरातील शाळा मधील विद्यार्थी, नागरिक, पोलिस पाटील, ज्येष्ठ नागरिक यांनी प्रदर्शनीला भेट देऊन पाहणी केली.