
सावंतवाडी : पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः धाड टाकून कणकवली येथे चालू असलेला जुगार अड्डा बंद केला. याबद्दल राणे यांचे मनसेतर्फे आम्ही अभिनंदन करतो. मात्र, पालकमंत्री या नात्याने पोलीस यंत्रणेला वारंवार अवैध धंद्यांबाबत इशारा देऊन देखील या धंद्यांना संरक्षण देणाऱ्या पोलीस यंत्रणेच्या अब्रूचे धिंडवडे या निमित्ताने निघाले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात चरस, गांजा याच जाळ विणणाऱ्या दोननंबर वाल्यांची माहिती पोलि दलस यंत्रणेला नसावी यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही हे असं मत मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी व्यक्त केले.
गोवा बनावटीची दारू कोण विकतोय ? या गोवा बनावटीच्या दारूची मोठ्या प्रमाणात कोण वाहतूक करतो. दारू कोणत्या मार्गाने कोठे जाते हि दारू कोठे साठवली जाते याची इत्यंभूत माहिती या पोलिस यंत्रणेला आहे. किंबहुना काही पोलिस हे बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांना संरक्षण पुरवून मालामाल झालेत. तर या धंद्यात अडकलेले काही पोलिस अधिकारी काही वर्षांपूर्वी पोलिस दलातून निलंबित देखील झालेत. लाखो रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू व अमली पदार्थ पोलिसांची चेक पोस्ट, गस्त चुकवून जिल्ह्यात येणे व त्या नंतर त्याचा संपूर्ण जिल्ह्यात पुरवठा होणे हिबाब पोलीस व राज्य उत्पादन शुल्क यांच्या मूक संमतीशिवाय अशक्य आहे. मनसे तर्फे यापूर्वी अनेक वेळा निवेदने देवून बेकायदेशीर व्यवसायांवर कारवाई करण्याची मागणी आम्ही केली होती. मात्र केवळ दिखावेपणा करून प्रसिद्धीसाठी कारवाई करायची व राजकीय पक्षांचा दबाव आहे. हा धाक दाखवून आपला हप्ता वाढवायचा हेच काम या यंत्रणांनी आतापर्यंत केलं आहे. आम्ही यापूर्वी सांगितल्याप्रमाणे पोलिस यंत्रणेमध्येदेखील काही प्रामाणिक अधिकारी व पोलिस कर्मचारी आहेत. मात्र हे देखील कोणाच्यातरी दबावाखाली काम करत आहेत. अवैध धंद्यांना संरक्षण दिल्याचा आरोप असल्यामुळे आपला एक वरिष्ठ अधिकारी निलंबित झालाय व त्यामुळे संपूर्ण पोलिस यंत्रणेची बदनामी झालेली आहे याची व आपल्या बुडाखाली देखील आग लागू शकते जाणीव ठेवून गोवा बनावटीची दारू, गुटखा, चरस, गांजा हे अवैध धंदे चालविणाऱ्या आकांच्या व मुख्य सूत्रधाराच्या लवकरात लवकर मुसक्या आवळा. तरच या जिल्ह्यातील जनता आपल्यावर विश्वास ठेवेल असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी पोलिस प्रशासनाला केले आहे.