पोलीस पाटील भरती प्रक्रिया राजकिय दबावाखाली खपवून घेणार नाही : सुशांत नाईक

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 05, 2024 13:14 PM
views 431  views

कणकवली :  शासनाने कणकवली विधानसभा मतदारसंघात पोलीस पाटील भरती प्रक्रिया राबवून उमेदवारांची लेखी व तोंडी परीक्षा घेतली आहे. या भरती प्रक्रियेत २९ डिसेंबर २०२३  रोजी निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर करणे व १ जानेवारी २०२४ पासून नियुक्ती आदेश देण्यात येणार होते.

मात्र, अद्याप हि भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही. काही कारणास्तव प्रांताधिकाऱ्यांनी या भरती प्रक्रियेला मुदतवाढ दिली असल्याचे समजते. मात्र, या मुदत वाढीची माहिती वुत्तपत्रातून प्रसिद्ध न करता केवळ नोटीस बोर्डावर नोटीस लावण्यात आली. त्यामुळे भरती परीक्षेतील उमेदवारांना कणकवली प्रांत कार्यालय व तालुकास्तरावरील तहसील कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत असून मनस्थाप सहन करावा लागत आहे. पोलीस पाटील भरती प्रक्रियेस विलंब झाल्याने निवड प्रकियेसाठी राजकीय दबाव येण्याची शक्यता आहे. मात्र प्रांताधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाखाली पोलीस पाटील निवड आणि प्रतीक्षा  यादी न करता गुणवत्तेप्रमाणेच निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केली पाहिजे. अन्यथा युवासेना हे खपवून घेणार नाही. या संपूर्ण निवड प्रकियेवर युवासेना लक्ष ठेवून आहे. प्रसंगी आंदोलन छेडण्याचा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिला आहे.