
सावंतवाडी : अंमली पदार्थांच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांसमोर जनजागृती करण्यात येईल. त्यासाठी प्रथम प्राचार्य, प्राध्यापक आदींची बैठक आयोजित करण्यात येईल असे आश्वासन पोलिस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे यांनी दिले. आषाढी एकादशी आणि मोहरम सणाच्या निमित्ताने शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे व पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी ही माहिती दिली.
यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश खंदारकर उपस्थित होते. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी उपनगराध्यक्ष गोविंद वाडकर, ॲड. नकुल पार्सेकर, अभिमन्यू लोंढे,हिदायतुल्ला खान,ऑगोस्तीन फर्नांडिस आदी उपस्थित होते. आषाढी एकादशी आणि मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. सावंतवाडी शांतता प्रिय शहर आहे. त्यामुळे या दिवशी होणाऱ्या गर्दी वर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलीस नेमण्यात यावेत असे सुचविण्यात आले.