
कणकवली : कणकवली येथील एका रिक्षाचालकाने अन्य एका साथीदारांच्या मदतीने परप्रांतीयाचे २५ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता अपहरण केले. फिर्यादी धीरेंद्र कुमार श्रीकांत यादव (रा. उत्तरप्रदेश) यांना गोवा सीमेपर्यंत रात्रभर अपहरण करुन कुडाळ येथील एसबीआय बँक एटीएमवर त्याच्या डेबिट कार्डद्वारे १८ हजाराची लूट केली. तसेच दोन्ही संशयित आरोपींनी २० हजार किमतीचा मोबाईल काढून घेत कुडाळ बस स्थानकात फिर्यादीला सोडले. धीरेंद्रकुमार यादव यांनी कणकवली पोलिसांत दिलेल्या फिर्यादी नुसार तपासाची चक्रे फिरली आणि सीसीटिव्ही फुटेज तपासून रिक्षा शोधून काढली. काही तासातच दोन्ही आरोपींना कणकवली पोलिसांनी अटक केली. या घटनेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
कणकवली पोलीस ठाण्यात धीरेंद्र कुमार श्रीकांत यादव (रा. उत्तरप्रदेश) याने दिलेल्या फिर्यादीनुसार धिरेंद्र कुमार २५ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता मोटरसायकलने कणकवली शहरातील पटवर्धन चौकात आले होते. रेल्वे स्टेशनजवळील समर्थनगरकडे जाण्यासाठी रिक्षा मध्ये बसले. त्यानंतर रिक्षचालक अल्ताफ अत्तर व सहकारी आरोपी सुहास घोगळे यांनी धीरेंद्रकुमार याला मारहाण करून त्याला गोव्याच्या दिशेने घेऊन गेले. गोवा हद्दिपर्यंत रात्रभर फिरवत पून्हा २६ रोजी डिसेंबर कुडाळात आणले व त्याच्याकडील एटीएम कार्ड घेत पासवर्ड घेऊन १८ हजार रुपये एटीएममधून काढून घेतले. २० हजारचा मोबाईल हिसकावून घेत त्याला कुडाळ एसटी बस स्टँड येथे सोडून दिले. त्यानंतर फिर्यादीनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या गुन्ह्यात आरोपी अल्ताफ अत्तर आणि सुहास घोगळे याला कणकवली पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर करत आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ,राजेंद्र गाडेकर, शरद देठे,पोलीस पांडुरंग पांढरे, वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण यांच्या पथकाने आरोपींना बेड्या ठोकल्या.