डंपर वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई

Edited by:
Published on: April 30, 2025 20:35 PM
views 136  views

कुडाळ : कुडाळच्या आठवडा बाजाराचे औचित्य साधून कुडाळ पोलिसांनी आज  मुख्य रस्त्यावरून होणाऱ्या डंपर वाहतुकीवर कारवाई केली. कारवाई झालेले बहुतेक डंपर हे गोवा पासिंगचे आहेत. कुडाळ पोलीस ठाण्यासमोरच वाहतूक पोलीस ज्योती रायशिरोडकर यांनी भारतीय दंड संहिता कलम २८५ व २८१ अन्वये  ही कारवाई केली.

कुडाळ शहरातून डंपर वाहतूक राजरोस सुरु असते. पण एखादवेळी अपघात झाला की ही डंपर वाहतूक सुरु असल्याची जाणीव सर्वाना होते. मग, असे कारवाईचे आदेश दिले जातात. गेल्याच आठवड्यात कुडाळ पोस्ट कार्यालयाजवळच्या चौकात डंपरची धडक बसून एका पादचाऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याचा उजवा हातच डंपरच्या चाकात अडकला होता. त्या पूर्वी सुद्धा असे अनेक अपघात त्या चौक आणि परिसरात झाले आहेत. त्या प्रत्येक वेळी निदान बुधवारी आठवडा बाजारादिवशी तरी डंपर वाहतूक बंद करावी अशी मागणी नागरिकांनी, सामाजिक संस्थांनी केली. पण त्याला सगळ्याच प्रशासनाकडून वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या. ही वाहतूक नियमितपणे राजरोसपणे सुरु असल्याचेच चित्र आहे. 

पण आज बुधवारी आठवडा बाजारादिवशी डंपर आणि अवजड वाहतूक बंद करण्याची कारवाई कुडाळ पोलिसांनी केली. कुडाळ पोलीस ठाण्यासमोर वाहतूक पोलीस ज्योती रायशिरोडकर यांनी मुख्य मार्गावरून जाणारे डंपर थांबवून ते पोलीस ठाण्यात वळवण्यात आले. भारतीय न्याय संहिता कलम २८५ आणि २८१ अन्वये हि कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले. या कारवाईबाबत नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आणि या कारवाईत सातत्य राहिले पाहिजे अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त करण्यात आली. 

कुडाळ शहरात सध्या वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल झाला आहे. त्यातच शहरातून ही डंपर वाहतूक राजरोसपणे सुरु आहे. बुधवारी आठवडा बाजारादिवशी त्यामुळे अनेकवेळा पोस्ट कार्यालयात नाका, पोलीस ठाणे या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे निदान बुधवारी आठवडा बाजारादिवशी तरी डंपर वाहतूक बंद करून ती  अन्य मार्गाने वळवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. पण त्याची ठोस अम्मलबजावणी झाल्याचे मात्र अजून तरी दिसलेले नाही. नाही म्हणायला गणेशोत्सव काळात ही अवजड आणि डम्पर वाहतूक बंद असते. मग मुद्दा हा उपस्थित होतो कि ते १०-११ दिवस जे शक्य होते ते अन्य दिवशी का होत नाही ? अर्थात त्याला गरजेची आहे ती लोकप्रतिनिधी, नागरिक आणि संबंधित प्रशासन यांची सकारात्मक मानसिकता . नाहीतर हे असेच चालू राहणार, अशा प्रतिक्रिया नागरीकातून ऐकायला मिळाल्या.