PM किसानच्या 'त्या' लाभार्थ्यांची झाली चौकशी ; उघडं झालं 'हे' मोठं सत्य

Edited by: भरत केसरकर
Published on: June 27, 2023 19:48 PM
views 145  views

सिंधुदुर्गनगरी :  पी. एम.किसान योजनेअंतर्गत ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करत असताना मौजे डिगस ता. कुडाळ येथे 108 बांगलादेशी नागरिकांनी पी. एम. किसान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल केल्याचे वृत्तपत्रातील बातमीव्दारे निदर्शनास आले आहे.* सदर प्रकरणाची चौकशी व तपासणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी (महसूल)  कुडाळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार मौजे डिगस गावात एकूण 52 लाभार्थी अपात्र असल्याचे आढळून आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.

या लाभार्थ्यांची माहिती तपासली असता त्यापैकी एकूण 37 अपात्र लाभार्थी यांनी नमुद केलेला IFSC कोड, बँकेचा तपशिल हा पश्चिम बंगाल, बिहार व उत्तर प्रदेश या राज्यातील आढळून आला आहे. यावरून वृत्तपत्रीय बातमीमधील ‘बांगलादेशी नागरिक’ हा उल्लेख संयुक्तिक नसल्याचे नमुद केले आहे. तसेच या सर्व लाभार्थ्यांना यापूर्वीच अपात्र ठरवून त्यांना या योजनेचा लाभ अदा करणे  थांबविण्यात आले आहे. यानंतर अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांची पुनश्चः खात्री करण्यासाठी सदर अपात्र लाभार्थ्यांची यादी पोलीस अधिक्षक सिंधुदुर्ग यांना पत्राद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाठविण्यात आली आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात इतर तालुक्यांमध्ये असे परराज्यातील अपात्र लाभार्थी असण्याची शक्यता विचारात घेता जिल्ह्यातील उपविभागस्तरावर समिती गठित करण्यात आली असून सदर समितीस लवकरात लवकर अहवाल सादर करण्यास कळविले आहे. सदर समितीचा अहवाल प्राप्त होताच अशा लाभार्थ्याची यादी पोलीस विभागाकडे पुन्हा पडताळणी करून अशा लाभार्थ्यांचे लाभ थांबविण्यात येऊन त्यांना झालेल्या अदा रकमेची वसुली करण्यात येणार आहे.