निवारा शेडविना नांदगाव तिठ्यावर प्रवाशांचे हाल

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 20, 2023 20:12 PM
views 63  views

देवगड : मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सिंधुदूर्गात पुर्ण होवून बरेच दिवस लोटले. मात्र या महामार्गावरील सर्वात महत्वाचा असणाऱ्या नांदगांव तिठा येथे अद्यापही ठेकेदाराने प्रवाशी निवारा शेड उभारलेली नाही आहे. यामुळे देवगडकडे येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. तसेच प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या प्रश्नी महामार्ग ठेकेदारा बाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

नांदगांव तिठ्ठ्यावरून देवगडला यायला मार्ग आहे. यामुळे देवगडला येणारा प्रत्येक प्रवाशी नांदगांव तिठ्ठयावर उतरतो. तसेच अन्य ठिकाणी जायचे असल्यास देवगडहून वाहन पकडून नांदगांव तिठ्ठ्यापर्यंत जातो व तेथून त्याच्या इच्छित स्थळाकडे प्रवास करतो.

सध्या प्रवाशी उड्डाण पुलाच्या खाली उभे असतात.गाडी दिसल्यावर धावाधाव सुरू होते.वृध्द, अपंग, महिला, गर्भवती महिला, विद्यार्थी, रूग्ण यांचे प्रचंड हाल होतात.बऱ्या चवेळा धावत जावून थांबविलेली गाडी वेगळीच असते.यामुळे वाहनचालकाच्या रोषाला सामोरे जावे लागते.उड्डाण पुलाखाली मोठ्या प्रमाणात गाड्यांचे अवैध पार्कींग केले जाते आहे. यामुळे उड्डाण पुलाखालून फिरणाऱ्या  गाड्यांना अरूंद रस्ता शिल्लक राहतो.यामुळे तेथे अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात निर्माण होतो.पावसात देवगडला येणारी एस्टी पकडण्यासाठी भिजत उभे राहावे लागते.यामुळे जेथे देवगडला यायला मार्ग आहे त्या तिठ्ठ्यावर प्रवाशी निवारा शेड उभारण्याची तातडीने गरज आहे.तसेच फोंड्याकडे जानाऱ्या मार्गालाही दुसरी प्रवाशी शेड उभारणे गरजेचे आहे.ही प्रवाशी शेड ठेकेदारानेच उभारणे गरजेचे असून, मुंबई महामार्गाची अपूरी कामे या यादीमध्ये अद्यापही नांदगांव तिठा येथे प्रवाशी निवारा शेड उभारणे हे काम नमुद होत नाही याबाबत आश्चर्य वाटते.

ही शेड देवगड रस्त्यालाच उभारणे गरजेचे आहे म्हणजे प्रवाशांना कोठे उभे राहायचे आहे. हे लक्षात येईल.याबाबत सामाजिक कार्यकर्ते  पंढरी वायंगणकर यांनी या शेडसाठी आपण पाठपुरावा करीत असल्याचे म्हटले आहे.