श्रीरंग चॅरीटेबल ट्रस्टकडून घाटीवाडीत प्लास्टीक फ्री अभियान

Edited by: विनायक गावस
Published on: July 01, 2023 11:55 AM
views 172  views

घाटीवाडी : 'प्लास्टिक' हे  नाव आज अगदी आपल्या अंगवळणी पडलंय. दैनंदीन जीवनाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा प्लास्टीक आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेला आढळतो. मानवी आरोग्यावर आणि पर्यावरणावर भयंकर दुष्परिणाम करणारं प्लास्टीक आपण मनात असूनही दूर लोटू शकत नाही ही आजची सत्यपरिस्थिती आहे. यासाठी 'श्रीरंग  चॅरीटेबल ट्रस्ट', झाराप ग्रामपंचायत आणि घाडीवाडी यांच्यातर्फे प्लास्टीक फ्री अभियानाची सुरवात  घाडीवाडी येथे करण्यात आली.    


घराच्या बाहेर दिसणारे अस्ताव्यस्त पसरलेले प्लास्टीक आणि वस्तीच्या ठिकाणी दिसणारे प्लास्टीकचे ढिग पाहीले तर या विदारक परिस्थितीची जाणीव आपणाला होते. जून्याकाळात प्लास्टीकचा वापर होत नसताना देखिल दैनंदिनी व्यवस्थित चालू होती पण प्लास्टीकच्या निर्मितीमुळे कमी खर्चात किंवा अस म्हणा की मोफत आपणाला या सर्वांना पर्याय उपलब्ध झाला. 


बर्‍याच देशात प्लास्टीकवर बंदी आणली जात असताना भारत देश मात्र प्लास्टीकच्या भयंकर विळख्यात अडकलेला आपणाला दिसतोय. संशोधनानुसार अस आढळून आलंय की, भारतातील जवळपास ८२% पाण्यामध्ये प्लास्टीकचे कण आहेत. जे मानवी आरोग्यास घातक असून खासकरून लहान मूले , गर्भवती महिलांसाठी फारच धोकादायक आहे. 


प्लास्टीकचा वापर जरी आपण 100%  बंद करु शकत नसलो तरी त्याचा वापर आपण मोठ्या प्रमाणात कमी करून त्यासाठी पर्यावरणपूरक पर्यांयांचा वापर सुरू करणे खूप महत्वाचे आहे.


यासाठी 'श्रीरंग  चॅरीटेबल ट्रस्ट', झाराप ग्रामपंचायत आणि घाडीवाडी यांच्यातर्फे लोकांना प्लास्टीकचे पर्यावरणपूरक  पर्याय उपलब्ध करून देणे, प्लास्टीकचे मानवी आरोग्यावरील दुष्परिणाम समजावून सांगण्यासाठी तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, वापरलेल्या प्लास्टिकचा पूर्नवापर करणे, आणि प्लास्टीकचा कचरा विघटन करण्यासाठी जमा करून योग्य ठिकाणी देणे यासाठी खास मराठी केंद्र शाळा झाराप नं १ येथे  शालेय मुलांना आणि ग्रामस्थांना मार्गदर्शन आणि प्रत्यक्षरित्या प्रात्यक्षिक घेण्यात आले.  


यामध्ये घाडीवाडीतील लोकांचा सहभाग आणि प्रतिसाद उर्जा देणारा होता. प्लास्टीक मुक्ती साठी झाराप गावातील घाडी वाडी नंतर संपुर्ण   गाव प्लास्टीक मुक्त करणे हेच या अभियानाचे मुख्य ध्येय्य आहे. या साठी श्रीरंग चॅरीटेबल ट्रस्टचे सुमित पाटील, अर्चना परब, वर्षा तळेकर नितिन गोलतकर बाळकृष्ण (दादा) मांजरेकर,  मराठी केंद्रशाळा नं १ चे शिक्षक शिरोडकर यांचे विशेष सहकार्य लाभले.