वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे २०० वृक्षांची लागवड...!

Edited by: दिपेश परब
Published on: August 12, 2023 19:00 PM
views 111  views

वेंगुर्ला : स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव अंतर्गत “मेरी मिट्टी मेरा देश” अर्थात “माझी माती माझा देश” हे अभियान संपूर्ण देशात राबविण्‍यात येत असून

आपल्या माती विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी, या मातृभूमीसाठी झटणारे तसेच त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणा-या शुरविरांचा सन्मान व्हावा या हेतूने ‘मिट्टी को नमन, वीरों को वंदन‘ अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून आज वृक्षदिडी काढून सुमारे २०० वृक्षांची लागवड करण्यात आली. 

सकाळी ८ वाजता नगरपरिषद कार्यालय, हॉस्पिटल नाका, अग्निशमन केंद्र ते कॅम्प स्टेडियमपर्यंत वृक्षदिडी काढण्यात आली. या दिडीमध्ये मुख्याधिकारी परितोष कंकाळ, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, कार्यालयीन अधीक्षक संगीता कुबल, अधिकारी वैभव माखवेकर, आनंद परब, सागर चौधरी, रविराज खतकर, निशा आळवे यांच्यासाहित वेंगुर्ला हायस्कूल, श्री शिवाजी प्रागतिक शाळा व बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे विद्यार्थी यांच्यासह नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले  होते. वृक्षदिडी कॅम्प स्टेडियम येथे पोहोचल्यानंतर त्याच ठिकाणी ‘अमृतवाटिका वृक्षारोपण‘ करण्यात आले. याठिकाणी देशी प्रजातीची जवळपास २०० वृक्षांची लागवड केली.

वेंगुर्ला नगरपरिषद ‘माझी माती, माझा देश‘, ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन‘ हे अभियान राबवित आहे. यानिमित्त १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नगरपरिषद कार्यालय येथे पंचप्रण शपथ व शिलाफलक अनावरण, दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वा. नगरपरिषद कार्यालय जुनी इमारत येथे ध्वजारोहण, सकाळी ७.३० वा. श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात माजी सैनिक सन्मान सोहळा, सकाळी १० वा. वेंगुर्ला हायस्कूल, हॉस्पिटल नाका, मार्केट, दाभोली नाका, शिरोडा नाका, पावर हाऊस, घोडेबांव गार्डनपर्यंत तिरंगा रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिली.