नौसेना दिनाचं मालवणात नियोजन सुरु !

पालकमंत्र्यांसह निलेश राणेंनी केली पाहणी
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 29, 2023 17:23 PM
views 1251  views

मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नौसेना दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 4 डिसेंबर रोजी मालवण, तारकर्ली दौऱ्यावर येत आहेत. राजकोट येथे उभारणी करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. नौदल, राज्य शासनाच्या माध्यमातून सर्व नियोजन सुरु आहे. सर्वसामान्यांना नौसेनेचा कार्यक्रम पाहता यावा यासाठी दांडी आणि तारकर्ली याठिकाणी खास व्यवस्था करण्यात येणार आहे. अशी माहिती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

मालवण दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांनी किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणी काम, तारकर्ली येथे नौसेना दिन कार्यक्रम व्यवस्था, टोपीवाला बोर्डिंग मैदान येथील हॅलिफॅड या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हाधिकारी किशोर तावडे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, राजन वराडकर, सचिन आंबेरकर, महेश मांजरेकर, आप्पा लुडबे, राजू परुळेकर, संतोष साटवीलकर, आशिष हडकर, ललित चव्हाण तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नौसेना दिनाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह काही केंद्रीय मंत्री व राज्याचे मंत्री उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा निश्चीत झालेला आहे. तसेच याठिकाणी सर्व नियोजन सर्व प्रकारची दक्षता घेवून कार्यक्रमाचे व्यवस्था केली जात आहे, असेही श्री. चव्हाण म्हणाले.

नौसेना दिनाचा प्रमुख कार्यक्रम हा तारकर्ली एमटीडीसी पर्यटन केंद्राच्या किनारी होणार आहे. जनतेला हा कार्यक्रम पाहता यावा यासाठी व्यवस्था करण्याचे,  नियोजन करण्यात येत आहे.