लांब पल्ल्याच्या प्रवासी फेऱ्या बंद करण्याचा देवगड आगारात सपाटा

विभागीय कार्यालयाची दुजाभावाची वागणूक..!
Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 02, 2023 14:00 PM
views 3405  views

देवगड : रापम विभागीय कार्यालय सिंधुदुर्ग विभागाने देवगड तालुक्यातील प्रवासी वर्गावर अन्याय करण्याचे धोरण अवलंबले असून लांब पल्ल्याच्या उत्तम भारमांनाच्या गाड्या बंद करण्याचा सपाटा लावला आहे .यामुळे एन दिवाळी सुट्टीचा हंगाम जवळ आला असताना प्रवासी वर्गाचे हाल करण्याचे धोरण विभागीय कार्यालयाने अवलंबून देवगड आगाराला दुजाभावाची वागणूक दिली जात आहे.सद्यस्थितीत देवगड रत्नागिरी ( पहाटे ५.००),देवगड सांगली दु.१२.१५,या गाड्या कित्येक दिवस बंद ठेवल्या असून आता देवगड तुळजापूर ही स.९.०० वा सुटणारी फेरी सुद्धा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे प्रवासी वर्गात तीव्र संताप व्यक्त करून नाराजी व्यक्त करत आहे.

यातच देवगड बोरिवली ही एकमेव प्रवासी फेरी ही अन्य विभागाकडे देण्याचा घाट या विभागीय कार्यलयाने घातला असल्याचे समजते.यातच नवीन गाड्या देवगड आगाराला न देण्याचा विडाच विभागीय वहातुक अधिकारी यांनी उचलला आहे.देवगड आगारातील सुमारे १२ गाड्या डोकिंग,पासिंग करीता नेण्यात आल्या अहेत व अन्य दोन गाड्या अन्य आगाराकडे देण्यात आल्याने स्थानिक फेऱ्या विलंबाने सुटणे,नादुरुस्त होणे,रद्द करणे असा एक कलमी कार्यक्रम देवगड आगाराचा सुरू आहे.देवगड ची शांत संयमी प्रवासी जनता मुग गिळून सहन करत आहे.स्थानिक लोकप्रतिनिधी,राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्तेही सुस्त असून प्रवासी जनता मात्र त्रस्त झाली आहे.याकडे विभाग नियंत्रकानी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.