खड्डयाला घातला 'हार' ; पुलाला सोसवेना भार !

ठेकेदार, अधिकारी, लोकप्रतिनिधींना वाहिली श्रद्धांजली
Edited by: विनायक गावस
Published on: November 11, 2023 13:42 PM
views 357  views
हायलाइट
रस्त्याची चाळण, पुलाला बसतायत हादरे !

सावंतवाडी : सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी जाणाऱ्या रस्त्यातच सार्वजनिक बांधकामच्या ठेकेदार, अधिकाऱ्यांनी मलिदा खाल्ला आहे. सहा महिन्याच्या आत रसत्याची झालेली अवस्था पाहून ते लक्षात येत आहे. कारिवडे-पेडवेवाडी ते माडखोल रस्त्यावर पडलेल्या खड्डयातून जीव मुठीत घेऊन लोकांना प्रवास करावा लागत आहे. खड्डे पडून माडखोल येथील पुलाला हादरे बसत असल्यानं मोठ्या दुर्घटनेची शक्यता आहे. याबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त करत पंधरा दिवस आवाज उठवून देखील प्रशासन लक्ष देत नसल्याने ठेकेदार, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना खड्डयाला हार घालून श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर यावर मंत्री रविंद्र चव्हाण व स्थानिक आमदार मंत्री दीपक केसरकर यांनी त्वरीत लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.


सावंतवाडी-बेळगाव रस्त्यावरील कारिवडे पेडवेवाडी, माडखोल परिसरात सहा महिन्यांपूर्वी रस्त्याच काम करण्यात आलं होतं. निकृष्ट दर्जाच काम केल्यानं या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले असून प्रवाशांसाठी 'यमाची दार' खुली झाली आहेत. जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करावा लागत आहे. पुलाला हादरे बसत असल्यानं सावित्री पुलासारखी घटना इथं घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत पत्रकार तथा प्रवासी काका भिसे यांनी केलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच शेअर होत आहे. त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याबद्दल लक्ष वेधून दोन आठवडे झाले तरी देखील प्रशासन लक्ष देत नसल्याने अखेर ठेकेदार, अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना खड्डयाला हार घालून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.


 माझ्या घरात मी एकुलता एक कमविणारा आहे. पत्रकारीतेसाठी सावंतवाडीत ये-जा करत असतो. यावेळी या खड्डयात पडून जर माझा अपघात झाला अन् बरं वाईट झालं तर माझ्या कुटुंबाला कोण पोसणार ? मंत्री की सार्वजनिक बांधकामचे अधिकारी ? या खड्डयांना बुजविण्यासाठी गेले २०-२५ दिवस लक्ष वेधत आहे. तरीसुद्धा लक्ष दिलं गेलं नाही. निर्लज्ज ठेकेदार व अधिकारी यांच्यापुढे हतबल होऊन मी त्यांना आज श्रद्धांजली अर्पण करत आहे. खड्डांना हार घालून ठेकेदार , अधिकारी,लोकप्रतिनिधींना मी श्रद्धांजली वाहिली आहे. कदाचित लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांना त्याचा राग येणार पण, आमचा जीव जाणार या खड्डयात. त्यामुळे याचा विचार त्यांनीही करावा. आम्ही ये-जा करणारे प्रवासी या खड्डयात मरणार हे आमच भविष्य आहे. जर थोडी लाज शिल्लक असेल खड्डे आठ दिवसात बुजवून रस्ता पुर्ववत करा, ठेकेदारावर कारवाई करा अशी मागणी काका भिसे यांनी केली आहे.


 हे काही नवीन नाही. आम्हालाच सोसावं लागत आहे. त्यामुळे आहे त्यातच प्रवास करावा लागत आहे. पोटापाण्यासाठी जीव मुठीत धरून ये-जा करत आहोत.

: प्रवासी


सहा महिने हा रस्ता टिकला नाही. प्रवास करताना भिती वाटते‌. संपूर्ण रस्त्याला खड्डे आहेत. पावसात रस्त्याला सुरुवात केली अन् तो पावसातच वाहून गेला.

: प्रवासी


एकंदरीत,येथून प्रवास करणारे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, दीपक केसरकर यांना देखील हे सोसावं लागत असून सामान्य प्रवाशांची व्यथा त्यांनाही जाणवत आहे‌. त्यामुळे याकडे लक्ष घालत विकास कामांसाठी पाठवलेला निधी कुणाच्या घशात गेला ? याची चौकशी करावी, मलिदा खाल्लेल्या ठेकेदार, अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होत असून लोकांच्या पैशातून तयार झालेले रस्ते किमान ३६५ दिवस तरी वापरता यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.