
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस विभागातील रिक्त असलेल्या पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे. बुधवार 19 जून पासून ही भरती प्रक्रिया सुरू झाली असून, या पहिल्या दिवशी 500 जणांना बोलविण्यात आले होते. यापैकी 336 जण प्रत्यक्ष उपस्थित राहिले. तर 35 जण अपात्र ठरले. यामुळे उर्वरित 301 जणांची बुधवारी शारीरिक चाचणी घेण्यात आली. तर उद्या गुरुवारी अजून 750 उमेदवारांना बोलविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस विभागातील तब्बल 142 रिक्त पदांवर सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी मार्चपूर्वी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर निवडणुका लागल्याने प्रत्यक्ष भरती प्रक्रिया थांबली होती. मात्र आता ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. बुधवार 19 जून पासून प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू झाली असून, 118 पोलीस शिपाई आणि 24 चालक शिपाई अशा एकूण 142 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. आजच्या पहिल्या दिवशी या भरती प्रक्रियेसाठी एकूण 500 उमेदवारांना बोलविण्यात आले होते. त्यापैकी 336 एवढे उमेदवार उपस्थित राहिले. यातील 35 जण अपात्र झाले तर उर्वरित 301 एवढ्या उमेदवारांची आज शारीरिक चाचणी घेण्यात आली. सर्व उमेदवारांची शारीरिक चाचणी झाल्यानंतर मेरिट लिस्ट तयार होईल व त्यानंतर मेरिट लिस्ट प्रमाणे पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा होणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष प्राप्त एकूण 8 हजार 42 अर्जांपैकी प्रत्यक्ष 142 कोणत्या उमेदवारांचा पोलीस भरतीमध्ये समावेश होतो हे समजणार आहे. दरम्यान गुरुवारी 750 उमेदवारांना बोलविण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली.
नीटनेटकी व पारदर्शक भरती प्रक्रिया
आत्तापर्यंत झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेतील सर्वात नीटनेटकी आणि पारदर्शक अशी भरती प्रक्रिया होत आहे. पावसाचे दिवस असूनही येणाऱ्या उमेदवारांची कागदपत्रे, कपडे, बॅगा आदी भिजणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. त्याचबरोबर बाहेरून येणारे उमेदवार यांची राहण्याची व्यवस्था ही करण्यात आली आहे. पावसामुळे शारीरिक चाचणीत कोणताही अडथळा येऊ नये यासाठीची सर्व काळजी घेण्यात आली आहे. बुधवारी पहिल्याच दिवशी अधून मधून पावसाच्या सरी येत होत्या मात्र असे असले तरीही शारीरिक चाचणी घेताना कोणताही त्रास उमेदवारांना झालेला नाही. त्यांना आवश्यक पाणी, केळी खाण्यासाठी इतर आवश्यक पदार्थ अशांची व्यवस्था ही नीटनेटकी करण्यात आली आहे. यामुळे बुधवारी झालेल्या पोलीस भरतीमध्ये कोणताही गोंधळ किंवा कोणतीही अडचण न येता ही प्रक्रिया पूर्णपणे शांततेत पार पडली.
कोणतीही अडचण असल्यास इथे संपर्क साधा
बाहेरून आलेल्या उमेदवारांची पोलीस हेडकोर्टर,साई माऊली हॉल कसाल, इश्चापूर्ती मंगल कार्यालय,ओरोस,होमगार्ड भवन ओरोस, सुहासिनी मंगल कार्यालय,कसाल या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.अशा सुमारे साडे आठशे जणांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.असे सांगतानाच उमेदवारांना कागद पत्रे किंवा अन्य कोणत्याही मदतीची किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता भासल्यास त्यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनीष कोल्हटकर 9421732569,तसेच पोलीस कंट्रोल रूम 02362 228200 येथे संपर्क करावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल यांनी केले आहे.