कृषीदुतांच्या कृषी माहिती केंद्राचे उदघाटन

Edited by: विनायक गावस
Published on: June 29, 2024 15:41 PM
views 112  views

सावंतवाडी : उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे मधील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम २०२४-२५ अंतर्गत कृषि माहिती केंद्राचे इन्सुली गावात उद्घाटन पार पडले. कृषिदूतांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात विविध प्रकारच्या माहितीचे तक्ते व अनेक शेती संबंधित वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले. 


हा कार्यक्रम ग्रामपंचायत सांस्कृतिक सभागृह इन्सुली, सावंतवाडी येथे पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ह्या कृषि माहिती केंद्राचे उद्घाटन झाले. तसेच सावंतवाडी कृषि पर्यवेक्षक यशवंत गव्हाणे, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे चे सहयोगी प्राचार्य डॉ. रंजित देव्हारे, कृषि सहाय्यक सीमा घाडी, इन्सुली ग्रामपंचायत उपसरपंच कृष्णा सावंत, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र चराटकर, महिला बचत गट अध्यक्ष खोपकर यांची उपस्थिती होती. ह्या प्रदर्शनामध्ये फळांपासून बनविलेले विविध पदार्थ, अनेक प्रकारचे किटकनाशक सापळे,विविध प्रकारच्या केल्या जाणाऱ्या कलम पद्धती, लखी बाग प्रकल्प, कोकेडामा व टेरारियम अश्या आधुनिक सजावट पद्धती मधील झाडे प्रात्यक्षिक स्वरूपात विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना समजावून सांगितले. तसेच महाराष्ट्र शासन कृषि विभाग योजनांचे व शेती संबंधित तक्ते लावण्यात आलेत. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांची व ग्रामस्थांची चांगली उपस्थिती लाभली.


सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील यांनी कृषिदूतांना व शेतकऱ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन केले. तसेच उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रफुल्ल माळी यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या. या कृषि माहिती केंद्राद्वारे हे कृषिदुत पुढील ६ महिने शेतकऱ्यांच्या पारंपारिक पद्धती व डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोलीने शिफारस केलेले आधुनिक तंत्रज्ञान यांचा मेळ घालून बळीराजाच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. या गटामध्ये प्रियश राघोबा धुरी, मल्हार संदिप महाजन, हर्षल अरुण पाटील, श्रेयस जयंत गायकवाड, ओवेश गुलाम मिर्झा नाडकर, नंदन आर, सौरजो किरण चौधरी या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.