
कणकवली : अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनीरिंग विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या प्रा. कल्पेश सुनिल कांबळे यांना कलिंगा विद्यापीठ, छत्तीसगड कडून पीएच.डी. पदवीने गौरवण्यात आले. त्यांच्या संशोधनातील अभूतपूर्व योगदान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील अनेक यशांमुळे त्यांचा हा प्रवास उल्लेखनीय ठरला आहे. या संशोधनाच्या प्रवासात त्यांनी मिळवलेल्या ८ भारतीय आणि २ आंतरराष्ट्रीय पेटंट्समुळे महाविद्यालयाला व महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली आहे.
त्यांचे २५ हून अधिक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले असून, २ पुस्तके ही प्रकाशित झाली आहेत. सध्या ते २२ आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये सहभागी समीक्षक व संपादकीय मंडळ सदस्य म्हणून कार्यरत आहेत. प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना, प्रा. कांबळे यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि संशोधन उपक्रमांना चालना दिली. त्यांच्या पीएच.डी. यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक उत्कृष्टता आणि संशोधनावर आधारित शिक्षणाच्या प्रतिष्ठेला आणखी भर पडली आहे. डॉ. कांबळे यांनी सांगितले,"हे यश माझे कुटुंब, विद्यार्थी, सहकारी आणि व्यवस्थापनाच्या पाठिंब्यामुळे शक्य झाले. मी अभियांत्रिकीच्या विकासासाठी अधिक योगदान देत राहीन."
संस्थेसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याची भावना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाडकर यांनी व्यक्त केली आहे. तसेच त्यांच्या उल्लेखनीय यशांना एस. एस. पी. एम. संस्थेचे संस्थापक मा. नारायण राणे, अध्यक्षा निलम राणे, उपाध्यक्ष निलेश राणे आणि सचिव नितेश राणे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.