
दोडामार्ग : तालुक्याच्या दोडामार्ग व गोवा हद्दीवरील व 90 टक्के दोडामार्ग तालुकावासीय ज्या भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पंपवर पेट्रोल डिझेल भरत असतात त्या पेट्रोल पंप अज्ञात चोरट्यांनी रविवारी फोडत तब्बलचोरट्यांनी १६ लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आल्या नंतर याबाबतची रीतसर तक्रार पेट्रोलपंप मालकाने गोवा दोडामार्ग पोलिस दूरक्षेत्रात नोंदवली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र या घटनेने दोडामार्ग व सीमावर्ती भागात एकच खळबळ उडाली आहे.
दोडामार्ग - गोवा सीमेवर दोडामार्ग तहसील कार्यालय पासून अगदी 100 मीटर अंतरावर गोवा हद्दीत भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या दोन्ही कंपन्यांचे पेट्रोलपंप आहेत. या दोन्ही पंपावर दरदिवशी लाखोंची उलाढाल होते. हे दोन्ही पंप सकाळी ६.३० ते रात्रौ १०.३० पर्यंत खुले असतात. हे पेट्रोल पंप जरी गोव्यात असले तरी त्याचा सगळ्यात जास्त फायदा दोडामार्ग वासियांना होतो. त्यापैकी भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोलपंप रविवारी रात्री बंद करून कामगार घरी गेले. सोमवारी सकाळी ते पुन्हा पेट्रोलपंपवर आले असता त्यांना ऑफिसचे कॅबिन खुले दिसले. कोणी तरी अज्ञातांनी ते फोडल्याचे निदर्शनास येताच एकच खळबळ उडाली. लागलीच त्यांनी पंपमालक व गोवा पोलिसांना याबाबत कळविताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी १६ लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार पंप मालकाने केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे मात्र सिमावर्ती भागासह दोडामार्ग तालुक्यात खळबळ उडाली आहे.