'त्या' खाडीतील वाळू लिलावास परवानगी

राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांची माहिती
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 20, 2023 19:34 PM
views 401  views

कुडाळ : कर्ली व कालावल खाडीतील वाळू लिलावाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्याचे बंदर तथा युवक कल्याण व क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्ली व कालावल खाडीतील वाळू लिलावास एमएमबीने परवानगी दिली आहे अशी माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे.


काका कुडाळकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, शासनाच्या धोरणानुसार कर्ली व कालावल भागात वाळू मिळणं मुश्किल झालं होते. त्यामुळे एमएमबीने या दोन्ही खाडित वाळू उत्खननास सर्वे करून परवानगी नाकारली होती. याबाबत राष्ट्रवादी अजित पवार गट जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व सर्व पदाधिकाऱ्यांनी कुडाळ मालवण प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांची भेट घेत कर्ली व कालावल भागातील वाळू लिलाव करण्याची मागणी केली होती. तसे निवेदनही दिले होते. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यावतीने राज्याचे बंदरे, युवक कल्याण व क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे कर्ली व कालावल या भागातील लिलाव करावा व जनतेला अधिकृतरित्या वाळू मिळावी यासाठी निवेदन दिले होते. यावेळी तातडीने संबंधित खात्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना उचित कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एमएमबीच्या हायड्रोग्राफर यांनी जिल्हाधिकारी यांना या दोन्ही खाडीमधील वाळू उत्खनन करण्याबाबत अधिकृतरित्या परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच कर्ली व कालावल या दोन्ही खाडीतील अधिकृतरित्या वाळू मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. तर जिल्ह्याच्या या गंभीर प्रश्नाकडे लक्ष दिल्याबद्दल मंत्री संजय बनसोडे यांचे आभार काका कुडाळकर यांनी मानलेत.