महायुतीचे सरकार यावं ही जनतेची इच्छा : सुलक्षणा सावंत

Edited by:
Published on: November 11, 2024 15:55 PM
views 167  views

वैभववाडी :  महायुतीचे सरकार यावं ही जनतेची इच्छा आहे. त्यासाठी या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नितेश राणे या मावळ्याला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या. असे आवाहन भाजपा प्रभारी, महिला मोर्चा संयोजिका, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा प्रमोद सावंत यांनी वैभववाडी येथे केले. वैभववाडी येथे महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ महिला मेळावा पार पडला. याप्रसंगी सौ सावंत बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, जिल्ह्यातील रस्ते एकदम दर्जेदार झाले आहेत. दर्जेदार रस्त्यामुळेच आपण गोव्याहून अगदी तासा दीड तासात वैभववाडीला पोहचले.

या मतदारसंघात नितेश राणे यांचे काम उत्तम प्रकारे चालले आहे. मागील अडीच वर्षात मतदार संघातील विविध विकास कामांसाठी 3165 कोटी इतका निधी त्यांनी आणला आहे. कोरोना काळात देखील नितेश राणे जनतेच्या पाठीशी राहिले आहेत. महिलांसाठी विविध योजना महायुतीच्या माध्यमातून राबविण्यात आल्या आहेत. काम करणाऱ्या आमदाराच्या पाठीशी उभे राहून मतदानाचा टक्का जास्तीत जास्त वाढला पाहिजे. याची जबाबदारी देखील आता महिलांची आहे. शेतीची कामे आहेत याची आपल्याला जाणीव आहे. परंतु काम करत असताना देखील आपण प्रचार केला पाहिजे. कोणाला निवडून द्यायचं, आपलं चिन्ह कोणतं, याची चर्चा महिलांमध्ये झाली पाहिजे असे सांगितले.