
मालवण : सध्या लग्न सराईचे दिवस सुरु असून लग्न सोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय प्रसंग. विवाह जुळविण्यासाठी सध्या अनेक विवाह संस्था आल्या आहेत. जिल्ह्यात एका ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या एका संस्थेकडून ग्राहकांना गंडा घालण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. विवाह होईल या आशेने अनेकजण अमिषाला बळी पडल्याने मोठी आर्थिक फसवणूक होत आहे. या टोळीच्या वेळीच मुसक्या न आवळल्यास अनेकांची यात फसवणूक होण्याची शक्यता आहे.
लग्न सराईचे दिवस सुरु झाले असून आपल्याला मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी साऱ्यांचेच प्रयत्न असतात. यासाठी अनेक माध्यमांचा प्रयत्न केला जातो. वय वाढत असल्याने इच्छुक वधू वर अनेक वेबसाईट, एजंट, सोशल मीडियाचा आधार घेतात. सध्या अनेक वेबसाईट, फेसबुकवर विवाह नोंदीच्या जाहिराती येत आहेत. त्यात तालुक्यातील एका युवकाने नोंदणी केली होती. नोंदणी झाल्यानंतर संबंधित संस्थेने काही फोटो त्या युवकाच्या व्हॉट्स अँप ला टाकले. त्यातील एक त्याने निवडला. फोटो निवडून झाल्यानंतर संबंधित संस्थेने आपण त्या मुलीशी आणि नातेवाईकांशी चर्चा केल्याचे सांगितले. 80 टक्के विवाह जुळला आहे. समोरासमोर पहिल्यानंतर स्थळ निश्चित होईल. मुलगी चांगल्या घराण्यातील असून माझं आणि माझ्या संस्थेचे नाव खराब होऊ देऊ नका. तसेच तुला कुठंच व्यसन वैगरे आहे का अशी विचारणा केली. यावर त्या युवकाने देखील आपल्याला कुठचेही व्यसन नसल्याचे सांगितले. त्यानंतर समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने आपल्याला स्थळ बघायला जायचे आहे. मी माझी गाडी घेतो त्यासाठी तीन हजार रुपये गुगल पे करण्यास सांगितले. विवाह पक्का होत असेल तर तीन हजार दयायला काय हरकत आहे. असे समजून त्या युवकाने तीन हजार रुपये गुगल पे केले. कुठे आणि कसे जायचे याची चर्चाही झाली. मात्र, जायची वेळ आली त्यावेळी संबंधित व्यक्ती फोन उचलत नव्हती. अनेक फोन करून हा युवक आणि त्याचे नातेवाईक वाट बघत राहिले. अर्धा दिवस झाला तरी त्या व्यक्तीचा पत्ताच नाही. संबंधित व्यक्ती फोन उचलत नसल्याने आपण यात फसलो गेलो हे लक्षात आले. त्याने पोलीस ठाण्यातही धाव घेतली.
प्रत्येक व्यक्तीचे तीन हजारच संबंधित संस्था घेत असल्याने कोणी उघडपणे बोलत नाहीत. परंतु हा प्रकार गंभीर असून जिल्ह्यातील अनेकांना या संस्थेने गंडा घातल्याची चर्चा आहे. तीन हजार गेल्याचे दुःख नाही. परंतु त्याला शासन व्हायला हवे. त्यासाठी आपले तीस हजार गेले तरी चालतील. परंतु त्या ठकसेनाच्या मुसक्या आवळणे गरजेचे असल्याचे संबंधित युवकाने सांगितले.