कुडाळ औद्योगिक वसाहतीतील प्रलंबित मागण्या प्राधान्याने मार्गी लावल्या जातील : श्रीकांत भारतीय

Edited by: विनायक गावस
Published on: November 18, 2023 19:31 PM
views 174  views

सिंधुदुर्ग : कुडाळ औधोगिक वसाहत ही या जिल्ह्यातील एकमेव जुनी औद्योगिक वसाहत असून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींचा ज्या वेगाने विकास झाला मात्र कुडाळ औधोगिक वसाहतीचा अपेक्षित विकास झाला नाही. यासाठी कुडाळ एम्. आय्. डि. सि. इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांच्या नेतृत्वाखाली असोसिएशनच्या वतीने प्रलंबित मागण्यांचे निवेदन असोसिएशनच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार श्री श्रीकांत भारतीय यांना दिले. 

  कुडाळ औधोगिक वसाहतीचे एकुण क्षेत्रफळ २७४ हेक्टर एवढे असून पैकी प्रत्यक्ष उद्योग व व्यवसायाकरीता आरक्षित भूखंड ९४० एवढे असून याचे क्षेत्रफळ १८४ हेक्टर एवढे आहे. या घडीला सुमारे ७५ हेक्टर एवढ्याच क्षेञात उद्योग असून इतर भूखंड विनावापर पडून आहेत. या भूखंडाबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. 

   २०१९ पूर्वी ज्यानी भूखंड घेतलेले आहेत व वीस टक्के बांधकाम त्यावेळच्या निकषानुसार पूर्ण करून पूर्तता प्रमाणपत्र घेतलेले आहे. अशा उद्योजकांनी उद्योग विस्ताराची गरज लक्षात घेऊन त्यांना चाळीस टक्के बांधकाम पूर्ततेसाठी अट घातली आहे. मात्र प्रत्यक्षात ही अट पूर्ण करणे कठीण असल्याने ही अट रद्द करण्याची विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. 

   छोट्या मोठ्या उद्योजकांना त्यांच्या व्यवसायात महाराष्ट्र औधोगिक विकास वसाहतीशी संबंधित अनेक समस्या असतात. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी रत्नागिरी येथे  दोनशे किलोमीटर  कार्यरत असलेल्या विभागीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. या जिल्ह्यात अलिकडच्या काळात दोडामार्ग तालुक्यातील आडाळी  येथे नव्याने विकसित होणारी औधोगिक वसाहत व कुडाळ   येथील वसाहत या दोन्ही साठी कुडाळ येथे विभागीय कार्यालय स्थापित करावे अशी मागणी असोसिएशनने केली आहे. यासाठी लागणारी इमारत व इतर सुविधा उपलब्ध आहेत. 

   विद्युत पुरवठा हा उद्योग व्यवसायिकांचा श्वास आहे जर तो बंद पडला किंवा सुरळीत पुरवठा  झाला नाही तर मोठे नुकसान होते. अखंडित व उच्च दाबाने वीजपुरवठा होण्यासाठी नवीन उपकेंद्र होणे आवश्यक आहे. कुडाळ सबस्टेशनकडे आवश्यक वीज क्षमता नसल्याने नवीन उद्योजकांना वीज पुरवठा करु शकत नाही. यासाठी तातडीने नवीन उपकेंद्र होण्यासाठी प्रयत्न करावेत. 

अशा अनेक प्रलंबित मागण्यांचे निवेदन मा आमदार भारतीय यांना देवून असोसिएशनने त्यांचे लक्ष वेधले. या चर्चेत त्यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. 

   यावेळी भाजपाच्या कोकण वैद्यकीय आघाडीचे डॉ. श्री अमेय देसाई, माजी अध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँकेचे चेअरमन श्री मनीष दळवी,श्री रणजित देसाई,असोसिएशनचे कार्यवाह ऍड. नकुल पार्सेकर, माजी अध्यक्ष श्री आनंद बांदिवडेकर, उपाध्यक्ष डॉ. श्री नितीन पावसकर, श्री संजीव प्रभू व इतर पदाधिकारी उपस्थित होते.