
सावंतवाडी : श्री गणेश चतुर्थी सण शांततेत आणि आनंदात साजरा करताना नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, असे आवाहन अप्पर पोलीस अधिक्षक नयोनी साटम यांनी केले. त्या म्हणाल्या, लेझर लाईटला बंदी असून डीजे नियमानुसार वाजविले पाहिजे. त्याचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाईल. सावंतवाडी पोलीस ठाण्यात श्री गणेश चतुर्थी सणाच्या निमित्ताने शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती तेव्हा अप्पर पोलीस अधीक्षक नयोनी साटम बोलत होत्या.
यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे, पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खदंकर उपस्थित होते. यावेळी नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम, वीज वितरण, एसटी बस,आरोग्य, वाहतूक व पार्किंग आणि शहरात भरणाऱ्या बाजाराबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक नयोनी साटम म्हणाल्या, या शांतता समितीच्या बैठकीतील मुद्दे सर्व प्रशासकीय यंत्रणेला कळविले जातील तसेच भक्तांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येईल.
यावेळी एसटी महामंडळ आगार व्यवस्थापक निलेश गावित म्हणाले, सावंतवाडी एसटी डेपो मध्ये जादा ६० ते ७० बसेस येणार आहेत. त्यांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची सोय करण्यासाठी एसटी विभागाने जादा फेऱ्यांची सोय करावी, रेल्वे स्थानक ते बांदा अशी बस सोडावी. रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार नाही अशी खबरदारी एसटी महामंडळाने घ्यावी अशी मागणी बैठकीत सदस्यांनी केली.
यावेळी रिक्षा भाडे दरपत्रक व रिक्षा हेल्पलाईन नंबर देता येईल का? याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक नयोनी साटम यांनी विचारले असता रिक्षा युनियनचे सरचिटणीस सुधीर पराडकर यांनी वस्तुस्थिती सांगितली. तसेच रिक्षा भाडे नाकारणाऱ्या वर कारवाई केली तरी हरकत नाही असे ते म्हणाले. तसेच वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पार्किंग व्यवस्था केली पाहिजे. रिक्षात सीएनजी गॅस भरण्यासाठी नियोजन करण्याची मागणी सुधीर पराडकर यांनी केली. सावंतवाडी शहरातील होर्डिंग्ज कधीही पडून अपघात होवू शकतात याकडे लक्ष वेधले. विनापरवाना होर्डिंग्ज लावले जातात याकडे लक्ष वेधले असता नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी गोविंद गवंडे यांनी परवानगी घेऊन होर्डिंग्ज लावले जातात असे सांगितले. तेव्हा सदस्यांनी अपघात होणार नाही आणि शहराच्या सौंदर्यात बाधा येणार नाही अशी खबरदारी घ्यावी.तसेच ठरवून दिलेल्या जागेत फलक लावण्यात आले पाहिजे असे सदस्यांनी मत नोंदविले.रेल्वेचे अधिकारी मधुकर मातोंडकर यांनी रेल्वे येण्याची वेळ आणि रेल्वे गाड्यांची संख्या सांगितली. तेव्हा सदस्यांनी रेल्वे व एसटी विभागाने समन्वयक ठेवून प्रवाशांची गैरसोय होणार नाही अशी खबरदारी घ्यावी अशी सूचना करण्यात आली.
सावंतवाडी शहरातील गणेश उत्सव मंडळ,मोती तलावाच्या काठावर विद्युत रोषणाई आदी बाबत अप्पर पोलीस अधीक्षक नयोनी साटम यांनी आढावा घेतला. तालुका व शहरातील खड्डेमय रस्ते , रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या घनदाट झाडी दूर करून खड्डेमुक्त रस्ते व्हावेत अशी मागणी सदस्यांनी केली. तर वीज वितरण हा प्रश्न जटील बनत चालला आहे याकडे लक्ष वेधले. सहाय्यक वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याने वीज वितरण बाबतीत आढावा घेतला. मात्र सदस्यांचे समाधान झालेले नाही याकडे लक्ष वेधले. सावंतवाडी कार्यालयातील फोन उचलला जात नाही याकडे लक्ष वेधण्यात आले. वीज वितरण कंपनीच्या कारभारामुळे शांतता भंग होणार नाही अशी खबरदारी घेतली पाहिजे याकडे सदस्यांनी मत नोंदविले. सावंतवाडी शहरातील रस्त्यांवर दुतर्फा वाहनांच्या रांगा लावल्या जाणार नाहीत यासाठी नगरपरिषदने नियोजन करावे, त्याला पोलिस सहकार्य करतील. तसेच पोलिसांना कारवाई करणे सोपे जाईल असे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले.
अमोल चव्हाण म्हणाले, उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य पथके एसटी बस स्थानक, रेल्वे स्थानकावर ठेवण्यात येणार आहेत. त्यांना सहकार्य करावे असे आवाहन केले.
यावेळी अंमली पदार्थ आणि गोवा बनावट दारू विक्री केली जाते. त्यामुळे तरूण पिढी बरबाद होईल अशी भिती व्यक्त करण्यात आली. याकडे लक्ष दिले जाईल असे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले. मुंबई-गोवा महामार्गावर झाराप झिरो पॉईंट येथून खासगी बसेस सावंतवाडी शहरात येणाऱ्या चाकरमानी प्रवाशांची गैरसोय करणार नाहीत, त्यांना सावंतवाडी शहरात आणून सोडतील याबाबत पोलिस व आरटिओ विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी अशी सूचना करण्यात आली. सावंतवाडी शहरातील व्यापाऱ्यांच्या मालवाहू गाड्या रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत बाजारात येतील असे नियोजन करावे असे आवाहन पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष गोविंद वाडकर, अँड नुकुल पार्सेकर,रिक्षा युनियनचे सुधीर पराडकर ,पत्रकार सिताराम गावडे,अभिमन्यू लोंढे, उमेश सावंत,रेल्वेचे मधुकर मातोंडकर, एसटीचे निलेश गावित, व्यापारी संघाचे जगदीश मांजरेकर, पुंडलिक दळवी, रिक्षा युनियनचे धर्मेंद्र सावंत, गजानन गद्रे , आमदार दीपक केसरकर यांचे प्रतिनिधी गजानन नाटेकर, ऑगोस्तीन फर्नांडिस, पुंडलिक दळवी,नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी गोविंद गवंडे, बांधकामच्या पावरा नीलम, मनवेल डिसोजा, विशाल सावंत, शैलेश मेस्त्री, संजय बागवे, किरण सावंत, शामसुंदर नाईक, बाळासाहेब बोर्डेकर, बाळा नार्वेकर, दुर्वेश रांगणेकर, अँड संदेश नेवगी, शांतता समिती, रिक्षा युनियन, गणेश मंडळ पदाधिकारी उपस्थित होते.