
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा नियोजनचा सर्वात जास्त निधी रस्त्यावर खर्च केला जातो, मात्र त्याच्या दर्जावरही तितकाच लक्ष देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आज जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या 33 व्या रस्ता सुरक्षा अभियान उदघाट्न प्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे, राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता अतुल शिवनीकर उपस्थित होते.
भारतामध्ये दर चार मिनिटाला अपघातामध्ये एक व्यक्ती मृत्युमुखी पडते, ही खरंच चिंतेची बाब आहे, असे बोलून जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी म्हणाल्या, की हे अपघाताचे प्रमाण सिंधुदुर्ग जिल्ह्यात तरी या 2023 मध्ये 50 टक्क्यापर्यंत कमी येण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करूया.
यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळेतील शंभर विद्यार्थ्यांना 'आपदामित्र' या अंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामध्ये एखादा अपघात घडला तर तातडीने करायची मदत कशी करता येईल, याचे हे प्रशिक्षण देणारा आपला सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रातील बहुतेक पहिलाच जिल्हा आहे.