कुडाळ : कुडाळ-केळुस एसटी प्रवासी मार्गावरील प्रवाशांची गेल्या अनेक महिन्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. तेंडोली चिखलोण वाडी येथील साकवाजवळ ‘शंभूगिरी मठ’ या नवीन अधिकृत बस थांब्याला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कडून मंजुरी मिळाली आहे. सामाजिक कार्यकर्ते निलेश तेंडुलकर आणि सहकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले असून, येत्या बुधवारपासून हा थांबा प्रत्यक्ष कार्यान्वित होणार आहे.
ग्रामस्थांची गैरसोय दूर
तेंडोली चिखलोण वाडीतून नदीपलीकडे जाण्यासाठी साकव उभारण्यात आल्याने मुननकर वाडी, मांजरेकर वाडी, बागलाची राय आणि आवेरे येथील ग्रामस्थांची सोय झाली होती. मात्र, साकवाजवळ अधिकृत एसटी थांबा नसल्याने बस येथे थांबत नव्हती. परिणामी प्रवाशांना, विशेषतः महिला वर्गाला, मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. अनेकदा चालक-वाहकांनी बस न थांबवल्याने ग्रामस्थांना लांब अंतर पायी जावे लागत असे.
निवडणुका व आचारसंहितेमुळे थांब्याचा प्रस्ताव काही काळ रखडला होता. आचारसंहिता संपताच निलेश तेंडुलकर यांनी विभाग नियंत्रकांशी चर्चा करून हा थांबा तातडीने मंजूर करण्याची मागणी केली. सेवाशक्ती संघर्ष एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी अशोक राणे व कुडाळ आगारातील कर्मचारी रोशन तेंडोलकर यांनीही कणकवली विभाग नियंत्रक कार्यालयात सातत्याने पाठपुरावा केला.
बुधवारपासून थांबा कार्यान्वित
थांब्यास मंजुरी मिळाल्याचे अधिकृत पत्र कुडाळ आगार प्रमुखांना प्राप्त होणार आहे. सध्या वाहकांकडे संगणकाधारित तिकीट यंत्रणा असल्याने सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक दुरुस्ती केल्यानंतर बुधवारपासून या ठिकाणी बस थांबण्यास सुरुवात होईल.
“शंभूगिरी मठ थांब्यामुळे नदीपलीकडील मुननकर वाडी, मांजरेकर वाडी आणि आवेरे परिसरातील प्रवाशांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत. प्रवाशांची जुनी मागणी पूर्ण झाल्याचा आनंद आहे,” अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते निलेश तेंडुलकर यांनी दिली.
या निर्णयामुळे तेंडोली व परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत पाठपुरावा करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.











