
सावंतवाडी : नारायण राणेंना मंत्रीपद न देऊन केंद्राकडुन कोकणावर अन्याय करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बाक वाजविणारा नको तर मंत्रीमंडळातला खासदार निवडून द्या असं आवाहन केलं होत. त्याप्रमाणे जनतेन कौलही दिला. मात्र, भाजपने बाक वाजविणाराच खासदार ठेवला अशी खोचक टीका उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे. तर मुतखड्यासारख्या आजारावर वेळीच उपचार न मिळाल्याने बांदा येथील रूग्णावर किडनी डेड होऊन ती काढण्याची वेळ आली. हा प्रकार म्हणजे जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींची नामुष्की असल्याचा आरोप डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला.
ते म्हणाले, गेली अनेक वर्ष प्रलंबित राहिलेला मुंबई-गोवा महामार्ग निदान गणेश चतुर्थीच्या पूर्वी तरी पूर्ण करण्यात यावा यासाठी नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी प्रयत्न करावेत. येथिल रोजगार, शिक्षण व आरोग्याच्या समस्या त्यांनी दुर करत कोकणवासीयांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. गेल्या अडीच वर्षात राणेंच्या मंत्रीपदाचा फायदा जिल्ह्याला अजिबात झालेला नाही. ते खात आता भाजपने बिहारच्या खासदाराला दिलं आहे. केंद्रात मंत्रिपद न देत एक प्रकारे भाजपने कोकणी जनतेचा अपमान केला आहे. ज्या कोकणाने महायुतीला सर्वाधिक खासदार दिले त्यांना मंत्रीपद देऊन कोकणाचा सन्मान करायला हवा होता. परंतु, भाजपने एक प्रकारे कोकणी जनतेचा हा अपमानच केला आहे.
दरम्यान, जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवरच आहे. ती सुधारत नाही आहे. उपजिल्हा रुग्णालयात आलेलं सिटीस्कॅन मशीन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. असा कोण मोठा उद्घाटन येणार आहे याची कल्पना नाही असा टोला त्यांनी हाणला. रूग्णांचे जीव महत्वाचे असताना ओरोसची कॅथलॅब सिंधुदुर्गतून बाहेर गेली. सामाजिक वनीकरणची जागा मागे असताना अडीच एकर जागेसाठी प्रशासनान योग्य निर्णय घेण्याची गरज होती. आज गोव्याशिवाय सिंधुदुर्गच्या लोकांना पर्याय राहिलेला नाही. 'भायलो'ची वागणूक सिंधुदुर्ग वासियांना आमच्या लोकप्रतिनिधींमुळे मिळत आहे. हा देखील कोकणी जनतेचा अपमान आहे. मुतखड्यासारख्या आजारावर वेळीच उपचार न मिळाल्याने बांदा येथील रूग्णावर किडनी डेड होऊन ती काढण्याची वेळ आली. हा प्रकार म्हणजे जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींची नामुष्की असल्याचा आरोप डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला.