BJP -सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मंत्र्यांवर विश्वास उरला नाही

उपरकरांचा टोला !
Edited by: उमेश बुचडे
Published on: May 31, 2024 10:45 AM
views 654  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप व शिवसेनेचे सत्ताधारीच पदाधिकारी व कार्यकर्ते प्रशासनाच्या विरोधात आंदोलने करत आहेत. महावितरण असेल किंवा पोलीस यंत्रणेच्या विरोधात असेल सत्ताधाऱ्यांची ही आंदोलने म्हणजेच त्यांना या निवडणुकीत आपला पराभव अटळ आहे. पुढील काळात आपणाला विरोधी पक्षात बसायचे आहे याची जाणीव झाल्याचेच उदाहरण म्हणावे लागेल अशी टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे. 

सावंतवाडी मध्ये किंवा कुडाळ मध्ये असेल शिवसेना व भाजपचे अनेक पदाधिकारी महावितरणच्या विरोधात आंदोलने करताना दिसतात. अधिकाऱ्यांना जाब विचारला जात आहे. त्याचा दुसरा अर्थ असाही आहे की सत्ताधारी पक्षाचे जे तीन तीन मंत्री या जिल्ह्यात आहेत त्यांच्यावर या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा विश्वास उरलेला नाही. जिल्ह्यासाठी जिल्ह्यातील लोकांसाठी हे मंत्री काहीच करू शकत नाहीत याची जणू खात्री पटल्याने हे पदाधिकारी व कार्यकर्ते आता विरोधी पक्षाप्रमाणे काम करत आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये. 

राज्यातील व केंद्रातील सत्ताधारी पक्षांनी गेल्या काही वर्षात जनतेच्या विकासात्मक दृष्ट्या कोणतेही काम केलेले नाही. सर्वसामान्य जनतेचा त्यांच्यावर विश्वास उरलेला नाही. त्यामुळे नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यात या सत्ताधाऱ्यांना जनतेचा पाठिंबा मिळालेला नाही. या निवडणुकीत आपला पराभव अटळ आहे. पुढील काळात आपणाला विरोधी पक्षातच बसायचे आहे याची पूर्णतः जाणीव झाल्याने जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रशासनाच्या विरोधात पावले उचलत आहेत. सावंतवाडीतील महावितरण चा विषय असेल कुडाळमधील महावितरण चा विषय किंवा कणकवलीतील अवैध धंद्यांबाबत भाजपा पदाधिकाऱ्यांची असलेली भूमिका हे याच साऱ्याचे द्योतक आहे अशी टीकाही श्री. उपरकर यांनी केली आहे.