खर्चाला पैसे न दिल्याने मुलाकडून आई - वडिलांना मारहाण

मुलावर गुन्हा दाखल
Edited by: साहिल बागवे
Published on: September 21, 2024 14:35 PM
views 32  views

कणकवली : तालुक्यातील हळवल येथे वडिलांनी खर्चाला पैसे न दिल्यामुळे ४५ वर्षिय मुलाने मारहाण केली. या मारहाणीत आई व वडिल गंभिर जखमी झाले आहेत. याप्रकरणी वडिलांनी कणकवली पोलिस ठाण्यात आपली फिर्याद नोंदवली आहे.  

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी सकाळी ८ वा. फिर्यादि अनाजी वामन राणे ८२, रा. हळवल-महान भाटलेवाडी हे झोपून उठले तेव्हा त्यांचा मोठा मुलगा विजय राणे वय ४५, हा घरातून कुठेतरी बाहेर निघून गेला होता. तो साधारणपणे सकाळी १० वाजता घरी आला. यावेळी वडिलांकडे खर्चासाठी पैशांची मागणी केली. वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला त्याचा राग आल्याने वडिलांना शिवीगाळी व दमदाटी करून घराच्या मागील बाजूस जाऊन बांबुच्या दांड्याने वडिलांच्या डाव्या हातावर, डाव्या कुशीवर व पायावर मारून दुखापत केली. त्यावेळी त्याची आई सुहासिनी पतीला मुलाच्या मारहाणीपासून दूर करण्यास पुढे सरसावली. मात्र त्यावेळी मुलाने तिच्या उजव्या हातावर बांबुचा दांडा मारून जोरात धक्का दिला. त्यावेळी आई सुहासिनी पायरीवरून खळयात पडली. दरम्यान आई पडल्यानंतर मुलाने पुन्हा वडिलांना मारण्यास सुरूवात केली. यावेळी मुलाने वडिलांच्या डाव्या कुशीवर मारून दुखापत केली.

 या मारहाणीत झालेल्या  फिर्यादि यांच्या पत्नीला डाव्या पायाला दुखापत झाली होती. तसेच नाकातून रक्त वाहत होते. यावेळी भांडणाचा मोठ- मोठ्याने आवाज आल्याने शेजारी अनंत राणे, शिवा राणे, सागर राणे, विठ्ठल राणे, अविनाश राणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी फिर्यादि अनाजी राणे व पत्नी सुहासिनी हे जखमी झालेल्या अवस्थेत आढळून आले. त्या दोघांनी त्यांनी उपचारासाठी कणकवली येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर फिर्यादि यांची पत्नी सुहासिनी यांच्या उजव्या मनगटात फ्रक्चर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

औषधोपचार केल्यावर वडिल अनाजी राणे यांनी मुलगा विजय अनाजी राणे वय ४५, याच्या विरूद्ध पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार विजय यांच्यावर भादवि कलम ११८(१), ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांच्या पथकाने विजय याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याचे तपासी अधिकऱ्यांनी सांगितले. अधिक तपास उपनिरीक्षक महेश शेडगे करीत आहेत.