मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालकांचे सजगत्व महत्त्वपूर्ण ; प्रा. रुपेश पाटील यांचे पुणे येथे व्याख्यानातून प्रबोधन !

'एनडीसीसी' चे आयोजन
Edited by: विनायक गांवस
Published on: January 10, 2023 18:59 PM
views 188  views

सावंतवाडी : गेल्या दोन वर्षात कोरोना कालावधीत ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे अनेक विद्यार्थी हे मोबाईल ॲडिक्ट झालेले आहेत. मात्र मोबाईलच्या अतिवापरामुळे बालमनावर विपरीत परिणाम होण्याची  शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी पालकांची सजगता आपल्या मुलांना योग्य दिशा प्राप्त करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते, असे मत सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी व्यक्त केले.

पुणे (नऱ्हे) येथे न्यू ज्ञानदीप कोचिंग क्लासेस यांच्या वतीने आयोजित व्याख्यानात प्रा. रुपेश पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्ञानगंगा अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य बबनराव जगताप, 'एनडीसीसी'चे संस्थापक  रोहित सुम्ब्रे उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. रूपेश पाटील पुढे म्हणाले की, आज सर्वत्र स्पर्धेचे युग आहे. आपला पाल्य स्पर्धेच्या युगात टीकावा ही प्रत्येकाची इच्छा असते. अशावेळी स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपल्या अनेक इच्छा आणि आकांक्षा आपण आपल्या मुलांवर लादतो, परिणामी अपेक्षांचे ओझे न पेलणारी मुले अनेकदा भरकटण्याची शक्यता असते. अशावेळी पालकांचे समुपदेशन अशा कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून होणे काळाची गरज आहे. एनडीसीसी याबाबतीत विविध उपक्रम राबवते म्हणून त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत, असे सांगत उपस्थित पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसनही प्रा. पाटील यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य बबनराव जगताप म्हणाले, बदलत्या काळानुसार शैक्षणिक पद्धतीदेखील बदलत असून अलीकडे पालकांचा कोचिंग क्लासेसवर अधिक भर आहे. अशावेळी योग्य क्लासची निवड करून त्यांच्या माध्यमातून आपल्या मुलांना यशोशिखरावर नेण्यासाठी पालकांची सतत धडपड सुरू असते. मुलांना योग्य संस्कारांची गरज देण्यासाठी शाळा आणि  चांगल्या क्लासेसची नितांत गरज आहे, असेही प्राचार्य जगताप म्हणाले.

प्रास्ताविक सादर करताना संचालक रोहित सुम्ब्रे म्हणाले की, विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या आयुष्याला आवश्यक अशा संस्कारांची जडणघडण करून देण्यासाठी प्रेरणादायी व्याख्यातांच्या व्याख्यानांची एनडीसीसीच्या माध्यमातून उपलब्धता करून दिली जाते. त्याचा लाभ अधिकाधिक पालक व विद्यार्थ्यांनी घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले. अतिथी मान्यवरांचा परिचय प्रा. नीता बेनके यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितीन राठोड यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. पाटील यांनी केले.