नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करा

बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाची मागणी
Edited by: उमेश बुचडे
Published on: October 13, 2022 14:57 PM
views 296  views

कणकवली : सतत होणाऱ्या अतिवृष्टी मुळे हातातोंडाशी आलेल्या भातपिकाचे नुकसान होत आहे. उभ्या भात पिकाच्या लोंब्याला (केसर) कोंब आलेले आहेत. तरी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी यांच्या भातशेतीचे तात्काळ पाहणी करून पंचयादी घालून लवकरात लवकर वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात यावी अशी मागणी कणकवली चे नायब तहसीलदार शिवाजी राठोड व तालुका कृषी अधिकारी व्ही वाय मुळे यांच्याकडे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडळातर्फे करण्यात आली.

याबाबत ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांनी संबंधित ग्रामपंचायत मध्ये किंवा कृषी सहाय्यकांना कळवा ही मागणी जिल्हाधिकारी स्तरावर पाठवून त्यानुसार पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात येतील अशी ग्वाही श्री राठोड व श्रीमती मुळे यांनी याप्रसंगी दिली. अवकाळी पावसाने नुकसान झाल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी यांना शासनाकडून शेतीच्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा अशी मागणी करण्यात आली. तसेच यावेळी ओला दुष्काळ जाहीर करा अशी देखील मागणी शिष्टमंडळातर्फे करण्यात आली. यावेळी भात पिकाला कोंब आलेली केसरे अधिकाऱ्यांना दाखवण्यात आली.

तसेच ई- पीक पाहणीची नोंद करून देखील सात बारावर त्याचा अंमल येत नसलेल्या शेतकऱ्यांच्या सात बाराच्या नोंदी तलाठ्यांना तातडीने करायला सांगा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. याबाबत सर्व मागण्या - - जिल्हाधिकाऱ्यापर्यंत पोहोचवण्यात येतील ग्वाही यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. याप्रसंगी राजन नानचे यांनी शेतकऱ्यांना प्रत्यक्षात येणाऱ्या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. पिक विमा योजनेबाबत जरी आवाहन केलात तरी प्रत्यक्ष वस्तू स्थिती वेगळी आहे. याकडेही अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. तर कोणत्याही स्थितीत शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहता नये याकरिता तातडीने पंचनामे करा अशी मागणी करण्यात आली.

यावेळी माजी जि. प. सदस्य संजय आंग्रे, माजी जि. प. सभापती संदेश पटेल, नायब तहसीलदार शिवाजी राठोड, तालुका कृषी अधिकारी व्ही वाय मुळे, दामू सावंत, राजन नानचे, प्रमोद सांगवेकर, निलेश तेली, सुनील हरमळकर, विवेक म्हसकर, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, आदी उपस्थित होते.