अवकाळीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी : आरिफभाई बगदादी

Edited by:
Published on: January 09, 2024 19:56 PM
views 233  views

देवगड : देवगड तालुक्यातील आंबा उत्पादन मोठ्या प्रमाणावर होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार सर्व बागायतदार शेतकरी अतिशय मेहनत घेत होते. बदलते हवामान असलं तरी लाखो रुपयांचा खर्च करून, नियमित कीटकनाशके व अन्य औषध फवारण्या करून आंबा मोहोर आणि छोटी आंबा फळे सुस्थितीत टिकविण्यात शेतकरी यशस्वी होत होते. 

काल सायंकाळीअचानक पडलेल्या तुफान पावसामुळे आंबा कलमांवरील सर्व मोहोर भिजून गेला असून, येत्या दिवसात भुरी तसेच बुरशीजन्य रोग होण्याची शक्यता आहे. तसेच पावसाच्या पाण्याचा दुष्परिणाम होऊन आंबा फळांवर काळे डाग पडून फळे निकृष्ट होऊ शकतात. आज देखील सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून पुन्हा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

आंबा उत्पादन समाधानकारक व्हावे या इच्छेने खते, कीटकनाशके, मेहनत मजुरी यावर लाखो रुपये खर्च करून अवकाळी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. आधीच कर्जबाजारी असलेला आंबा बागायतदार हातातोंडाशी आलेले आंबा पीक वाया जात असलेलं पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू वाहताना दिसत आहेत. 

सर्व आंबा बागायतदार शेतकऱ्यांची व्यथा समजून घेऊन प्रगतशील बागायतदार तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व भाजपा चे  जिल्हा सरचिटणीस आरिफभाई बगदादी यांनी तातडीने नुकसानी बाबत पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.  तसेच या नुकसानी बाबत शासन स्तरावर दखल घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी आमदार नितेश राणे साहेब यांना देखील विनंती केली आहे.