13 ऑक्टोबरला पं.स. - जि. प.आरक्षण सोडत

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 08, 2025 14:33 PM
views 205  views

देवगड  : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुका लढण्यास रिंगणात उतरण्यास इच्छुक असलेल्या  उमेदवारांसाठी १३ ऑक्टोबर २०२५ ही तारीख सुवर्ण संधी व राजकीय अस्तित्वाची लढाई ठरवणारी असणार आहे. १३ऑक्टोबरला जागांच्या आरक्षणाची अंतिम सोडत या दिवशी काढली जाणार आहे. 

यावेळी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार (दिनांक ०१.१०. २०२५), महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम, २०२५ नुसार ही संपूर्ण सोडत प्रक्रिया तहसिलदार कार्यालय, देवगड येथे सकाळी ११.०० वाजता पार पडेल.यावेळी सोडतीनंतरच गट आणि गणांमधील आरक्षण (अनु. जाती,अनु. जमाती, इतर मागास वर्ग आणि महिलांसाठी) कायमस्वरूपी निश्चित होणार आहे. 

आरक्षणाची सोडत जाहीर होताच, वर्षानुवर्षे तयारी करत असलेले अनेक इच्छुकांच्या स्वप्नांवर तातडीने परिणाम होणार आहे. ज्यांच्या गटातील जागा त्यांच्या प्रवर्गासाठी आरक्षित होतील, ते उमेदवार लगेचच प्रचाराच्या कामाला अधिकृतपणे सुरुवात करतील. याउलट, ज्यांची जागा आरक्षित होईल किंवा त्यांच्या प्रवर्गासाठी राहणार नाही, त्यांना नवा पर्याय किंवा दुसऱ्या गटाचा विचार करावा लागेल. त्यामुळे, ही सोडत राजकीय गणिते आणि उमेदवारीच्या चर्चांना त्वरित पूर्णविराम देणारी ठरणार आहे.

तहसिलदार कक्षामध्ये १३ ऑक्टोबर रोजी इच्छुकांनी, त्यांच्यासमर्थकांनी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक आणि नियमांनुसार होणार असल्याने, सर्व उपस्थितांनी शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देवगड प्रशासनाकडून करण्यात आले आहे.