युवा महोत्सवात पंचम खेमराज महाविद्यालयाचा विजयी डंका...!

बारा स्पर्धांत विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश
Edited by: विनायक गावस
Published on: August 18, 2023 17:12 PM
views 137  views

सावंतवाडी : वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात दि. १० ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत महाविद्यालयाची विजयी परंपरा कायम ठेवली. मराठी वादविवाद, मराठी वक्तृत्व, मराठी एकपात्री अभिनय, मराठी प्रहसन, हिंदी कथाकथन, हार्मोनियम एकलवादन, इंग्रजी वक्तृत्व आणि भारतीय लोकनृत्य अशा‌ आठ स्पर्धांत महाविद्यालयाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. हिंदी एकपात्री आणि हिंदी प्रहसन या स्पर्धांत द्वितीय, मराठी कथाकथन स्पर्धेत तृतीय तर सुगम संगीत गायन स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाला.

सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांना सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोसले यांच्या हस्ते गुलाबपुष्प व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सदस्य श्री. जयप्रकाश सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, सांस्कृतिक समन्वयक डॉ. डी. जी. बोर्डे, सहसमन्वयक डॉ. एस. एम. बुवा उपस्थित होते. 

यावेळी राणीसाहेब सौ शुभदादेवी भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत विद्यापीठ स्तरावरील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. एम. बुवा यांनी केले.