
कणकवली : संत ज्ञानेश्वर यांची जयंती व स्वातंत्र्यदिनानिमित्त कणकवली पंचायत समितीने शुक्रवारी कणकवली शहरातून संत ज्ञानेश्वर यांची पालखी मिरवणूक काढली. विठ्ठल-रखुमाईसह ज्ञानबा-तुकारामांचा जयघोष करण्यात आला. मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रखुमाईसह संत व वारकºयांची केलेली वेशभूषा लक्षवेधी ठरली.
या मिरवणुकीचा शुभारंभ पंचायत समितीच्या कार्यालय येथे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, प्रमोद ठाकूर, रामचंद्र शिंदे, रवी मेस्त्री, संजय कवटकर, मनोज चव्हाण, अनिल चव्हाण, तनोज कळसुलकर, विठ्ठल परब यांच्यासह पं.स.चे कर्मचारी हे उपस्थित होते. जि. प. शाळा नंबर ३ च्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकशी गोल रिंगण करून विठ्ठल-रखुमाईसह ज्ञानबा-तुकारामांचा जयघोष केला. त्यानंतर ही मिरवणूक मार्गस्थ झाली. बसस्थानक मार्गे पुन्हा पंचायत समितीकडे पालखी दाखल झाली. याठिकाणी या मिरवणुकीची सांगता झाली. या मिरवणुकीत उमेदचे कर्मचारी व बचत गटाच्या महिला सहभागी झाल्या होत्या.