कणकवलीत रंगला खेळ पैठणीचा | नेहा कोदे ठरल्या पैठणीच्या मानकरी !

कोकणसाद LIVE, माईलस्टोनचे आयोजन
Edited by: उमेश बुचडे
Published on: October 04, 2022 14:47 PM
views 534  views

कणकवली : कोकणचे नंबर वन महाचॅनेल कोकणसाद LIVE,  कोकणचे प्रथम दैनिक कोकणसाद व माईलस्टोन प्रायोजित 'खेळ पैठणीचा' हा महिलांसाठीचा विशेष कार्यक्रम कणकवलीच्या बाजारपेठ मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सव मंडपात सोमवारी चांगलाच रंगला. कणकवलीच्या बाजारपेठ मित्र मंडळाच्या सहकार्याने रंगलेल्या या कार्यक्रमात तब्बल ४८ महिलांनी सहभागी होत खेळ पैठणीच्या कार्यक्रमात रंगत आणली. यात पैठणीच्या मानकरी नेहा कोदे ठरल्या, तर द्वितीय पारितोषिकाच्या मानकरी प्रिया चव्हाण ठरल्या. उत्तेजनार्थ पारितोषिकाचे मानकरी प्रिया सरूडकर व स्वप्नाली जाधव ठरल्या.

अत्यंत दिमाखदार व रंगतदार कार्यक्रमाचे कणकवलीतील महिलांनी मनापासून स्वागत केले. दरवर्षी हा कार्यक्रम कणकवलीत घेण्याची विनंती देखील आयोजकांना केली.

प्रारंभी मंडळाचे अध्यक्ष तथा युवा नेते संदेश पारकर यांच्या हस्ते माता दुर्गादेवीच्या चरणी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष दीपक बेलवलकर, माईलस्टोनचे योगेश नायर, बबलू सावंत, समृद्धी संदेश पारकर, युवा सेना तालुका संघटक गौरव हर्णे, कोकणसादचे जाहिरात व्यवस्थापक समीर सावंत, कणकवलीचे प्रतिनिधी उमेश बुचडे आदी उपस्थित होते.

प्रत्येक फेरीत रंगला खेळ

'खेळ पैठणीचा' या कार्यक्रमात एकूण पाच फेऱ्या घेण्यात आल्या. या प्रत्येक फेरीत महिलांची उत्कंठा वाढतच होती. प्रत्येक फेरी दरम्यान महिलांची बौद्धिक, मानसिक कसोटी लागत होती आणि बहारदार सूत्रसंचालक प्रा. रुपेश पाटील महिलांना मनोरंजक पद्धतीने खेळ खेळवत मनोरंजन व प्रबोधनात्मक संदेशही देत होते, हे विशेष.

दरम्यान, अंतिम फेरीत प्रिया सरूडकर, स्वप्नाली जाधव, प्रिया चव्हाण व नेहा कोदे या स्पर्धक पोहोचल्या. मात्र यात सर्वात अव्वल ठरल्या त्या नेहा कोदे. त्याच पैठणीच्या मानकरीही ठरल्या, तर दुसऱ्या क्रमांकावर प्रिया चव्हाण यांनी बाजी मारत साडीचे बक्षीस जिंकले.

त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पैठणी विजेत्या नेहा कोदे यांना पैठणी बक्षिस देण्यात आली. चारही विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. युवा सेना तालुका संघटक गौरव हर्णे यांच्याकडून तृतीय पारितोषिक देण्यात आले.

यावेळी संदेश पारकर म्हणाले की, कोकणसाद लाईव्ह म्हणजे समाजाची सांस्कृतिक व सामाजिक गरज भागविणारे महाचॅनेल आहे. केवळ पत्रकारिता न करता समाजातील विविध घटकांना त्यांच्या गरजा पुरवत सामाजिक बांधिलकीतून पत्रकारिता जोपासणाऱ्या कोकणसादच्या प्रत्येक उपक्रमात विविधता असते. महिलांच्या सांस्कृतिक व मानसिक गरजेसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहवर्धक ठरला. मंडळाच्या वतीने पुढील वर्षीही आपण हा कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे पारकर म्हणाले.

 यावेळी व्यासपीठावर मुख्य प्रायोजक माईलस्टोन कंपनीचे योगेश नायर, बबलू सावंत व त्यांची संपूर्ण टीम, तसेच व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष दीपक बेलवलकर, कोकणसादचे जाहिरात व्यवस्थापक समीर सावंत,  कणकवली प्रतिनिधी उमेश बुचडे, समृद्धी पारकर, निलेश पारकर आदी उपस्थित होते.

या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन गौरव हर्णे, सर्वेश शिरसाट, नंदू बिडीये, मयूर पेडणेकर, पराग म्हापसेकर राजू वाळके यांनी केले.


वैभववाडी व कणकवलीतही 'नेहा'च विजेती

रविवारी वैभववाडीत आयोजित केलेल्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमात पैठणीच्या मानकरी ठरल्या होत्या 'नेहा महाडिक' तर सोमवारी कणकवली येथे आयोजित खेळ पैठणीच्या कार्यक्रमाच्या अंतिम विजेत्याही 'नेहा कोदे' ठरल्या आहेत. 'नेहा' नावाच्या महिलांनी दोन्हीही ठिकाणी खेळ पैठणीत विजेतेपद राखले. यांची चर्चा कणकवली येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांमध्ये रंगली होती.